मुंबई | 23 ऑक्टोंबर 2023 : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. याबाबत अनेक भूमिका समोर येत आहेत. दुसऱ्याच्या ताटातील नको. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हीच सार्वत्रिक भूमिका पुढे येत आहे. मनोज जरांगे यांच्या पाठीशी समाज उभा आहे. समाजाच्या सभेला लाखोंची गर्दी जमते. मराठा समाजात फूट पडणार नाही. आम्ही सारे दरांगेसोबत आहोत. सरकारने आरक्षण संदर्भात भूमिका घ्यावी. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण हवे आहे. मराठा समाजासंदर्भात दिलेल्या जाहिरातीवर विरोधक टीका करत आहेत. पण, मराठा समाजासाठी तात्पुरत्या उपाययोजना म्हणून केलेल्या त्या तरतूदी आहेत असे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सर्व पक्षीय नेत्यांना बोलावून चर्चा केली आहे. त्यातूनच शिंदे समिती स्थापन केली आहे. जातीजातीमध्ये तेढ नको. मराठा समाज सातत्याने शांततेची भूमिका घेऊन जगासमोर आदर्श स्थापन करणारा समाज आहे. तो शांततेत राहिल. कुणीही आत्महत्या करू नये, असे आवाहनही त्यांनी केले. काही सुप्त शक्ती आणि काही विरोधी पक्ष ओबीसींवर स्वार होऊन राज्य अस्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठा आरक्षणावर काम सुरु आहे. ओबीसीतून आरक्षण नको, असे वडेट्टीवार म्हणतात. मग, संविधानिक टिकणारे आरक्षण द्यायला हवे. त्यामुळे कुणी उसकावून आरक्षणाची भूमिका मांडू नये, अशी टीकाही त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केली.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. आपले मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कुणी एकाने मक्तेदारी घेतलेली नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेकांनी खतपाणी घातले. पण, मराठा समाज शांत होता. त्यांना आरक्षण दिले. मधल्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आरक्षण दिले. तेव्हा कसे सगळे शांत होते. पण, काहीही असले तरी हा समाजाचा प्रश्न आहे. आरक्षण द्यावे हीच सगळ्यांची भूमिका आहे असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण गेले. तेच आरक्षण फडणवीस सरकारने टिकवले होते. शिंदे आणि फडणवीस यांनी कुठेही मराठा आरक्षण विरोधी भूमिका घेतलेली नाही. टिकेल असे आरक्षण त्यांना द्यायचे आहे. मराठा समाजात मतभेद असू शकतील. पण त्यांना एकाच ध्येयाप्रती जायचे आहे असेही त्यांनी सांगितले.
अशोक चव्हाण हे अवसरवादी आहेत. आताच्या आंदोलनावर ते पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत हे सुद्धा भोंदू बाबासारखे संधी साधत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सेनेने मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला दाबण्याचे प्रयत्न केला. समोरच्याची भूमिका निगेटिव्ह असेल तर आपल्याला बोलता येईल. राज्यातील सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारला समाजाची दिशाभूल करायची नाही. कुणी मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर संशय घेऊ नये. त्यांच्याबाबत शंका निर्माण करू नये असे दरेकर म्हणाले.