‘तेव्हा लोक माझ्या कानात…’; अशोक चव्हाण रोहित पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Apr 13, 2025 | 5:11 PM

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण यांनी रोहित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

तेव्हा लोक माझ्या कानात...; अशोक चव्हाण रोहित पवारांबद्दल नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल नांदेडमध्ये त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला खासदर अशोक चव्हाण, शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके, आमदार बाबुराव कदम, भाजपाचे आमदार श्रीजया चव्हाण यांची उपस्थिती होती.  धनगर समाज व महायुतीच्या वतीनं या सत्काराचं आयोजन करण्यात आलं, या कार्यक्रमात बोलताना भाजप नेते अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले अशोक चव्हाण?

राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती नियुक्ती करण्यात आलेली नाही, तर त्यांची त्या पदावर बिनविरोध निवड झाली आहे. तुम्ही भाग्यवान आहात, तुम्ही बिनविरोध निवडून आलात. राम शिंदे यांचा अनुभव दांडगा आहे, ग्रामपंचायतपासून ते विधानसभा, मंत्री आणि आज ते सभापती झाले आहेत.

असं म्हणतात मुंबईच्या काळबादेवी परिसरात गाडी चालवली की तो चालक कुठेही गाडी  चालवू शकतो. एवढी ट्राफिक त्याठिकाणी असते, तसेच जो अहिल्यानगर जिल्ह्यातून निवडून येऊ शकतो, तो कुठेही निवडून येऊ शकतो. आगामी काळात ते पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्यानं विधानसभेत निवडून येतील. सभागृहाची उंची वाढविण्यासाठी सभापती हा महत्त्वाचा आहे.

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. मला जेव्हा रोहित पवारांनी बोलावलं होतं, तेव्हा मी कर्जत जामखेड मतदारसंघात गेलो होतो तेव्हा मी दुसऱ्या पक्षात होतो. पण तेव्हा लोक मला कानात सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस राम शिंदेंच आहे, असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

नांदेडमध्ये कृषी महाविद्यालय झाले पाहिजे, यासाठी मी चीफ सेक्रेटरी यांच्याकडे गेलो होतो.
तेव्हा चीप सेक्रेटरी म्हणाले, हे होणार नाही. मी त्यांना सांगितलं निर्णय मुख्यमंत्री घेत असतात चीप सेक्रेटरी नाही. तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यांनी यासंदर्भात निगेटिव्ह शेरा दिला होता. त्यानंतर आमचं सरकार गेलं. शेवटी ती फाईल पुढे आमदार बालाजी कल्याणकर यांनी नेली आणि एकनाथ शिंदे यांनी ते काम केलं, असंही यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे.