अखेर महायुतीतील मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. महायुतीने जागा वाटपाचा एक फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार मुंबईत भाजपच मोठा भाऊ ठरणार आहे. तर त्याखालोखाल शिंदे गटाला जागा मिळणार आहेत. विशेष म्हणजे शिंदे गटाकडे मुंबईचे जास्त आमदार नसतानाही अधिक जागा मिळवण्यात शिंदे गटाला यश आलं आहे. तर अजितदादा गटाला मुंबईत फक्त तीन जागा देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीतील मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला आहे. नव्या फॉर्म्युल्यानुसार मुंबईतील 36 जागांपैकी भाजप 18 जागांवर लढणार आहे. तर शिंदे गट 15 जागांवर आणि अजितदादा गट अवघ्या तीन जागांवर लढणार आहे. मुंबईत अजितदादांच्या राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. त्यामुळे अजितदादा गटाला तीन जागा देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजितदादा गट मुंबईतील अणुशक्तीनगर, वांद्रे पूर्व आणि शिवाजीनगर-मानखुर्द या मतदारसंघातून लढणार आहे.
दोन जागा महत्त्वाच्या
नवाब मलिक हे अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. तर वांद्रे पूर्व मतदारसंघात झिशान बाबा सिद्दीकी हे आमदार आहेत. त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ मिळवण्यात राष्ट्रवादीला यश आलं आहे. तर शिवाजीनगर-मानखुर्द या मतदारसंघात समाजवादी पार्टीचे नेते अबू आजमी हे आमदार आहेत. या मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदार अधिक आहेत. त्यामुळे ही मते अजितदादा यांच्या राष्ट्रवादीला मिळू शकतात, त्यामुळे अजितदादा गटाला हा मतदारसंघ सोडण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
महापालिकेचं गणित
दरम्यान, मुंबईतील जागा वाटप करताना महायुतीने दोन गोष्टींवर भर दिल्याचं सांगितलं जात आहे. एक म्हणजे उमेदवारांची निवडून येण्याची क्षमता आणि दुसरी म्हणजे मुंबई महापालिकेच्या निवडणुका. भाजपने मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अधिकाधिक जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवल्याचं सांगितलं जात आहे.
पाच आमदार घरी बसणार?
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत ज्या आमदारांच्या मतदार संघातून कमी लीड मिळाला अशा आमदारांना घरी बसवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राम कदम, पराग शाह, भारती लव्हेकर, तमिल सेल्वन आणि सुनील राणे यांचा पत्ता कापला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. राम कदम यांच्या जागेवर मनोज कोटक यांना तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे. तर पराग शाह यांच्या जागी प्रकाश मेहता, भारती लव्हेकर यांच्या जागी संजय पांडे, तमिल सेल्वन यांच्या जागी राजश्री शिरवडकर आणि सुनील राणे यांच्या जागी गोपाळ शेट्टी यांना तिकीट दिलं जाणार असून यात दोन माजी खासदारांचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं.