‘त्या’ 25 जागांवर शिवसेना शिंदे गटाचं घोडं आडलं, उमेदवारांची पहिली यादी कधी?

| Updated on: Oct 22, 2024 | 3:21 PM

भाजपकडून जरी आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली असली तरी देखील अजूनही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये.

त्या 25 जागांवर शिवसेना शिंदे गटाचं घोडं आडलं, उमेदवारांची पहिली यादी कधी?
Image Credit source: Facebook
Follow us on

विधानसभेचं बिगूल वाजलं आहे, निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 20  नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. मात्र अजूनही भाजप वगळता महायुती आणि महाविकास आघाडीच्या एकाही घटक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आलेली नाहीये. भाजपकडून रविवारी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये 99 जणांचा समावेश आहे.

दरम्यान भाजपकडून जरी आपली पहिली यादी जाहीर करण्यात आली असली तरी देखील अजूनही राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली नाहीये. मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे महायुतीत शिवसेनेचं घोडं 25 जागांवर आडलं आहे, त्यामुळेच उमेदवारांच्या यादीला विलंब होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रफुल पटेल याच्यांमध्ये यावर बैठकीत चर्चा झाली आहे. भाजपने पहिली यादी जाहीर केल्यानंतर सोमवारी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ६० नावांची यादी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यावेळी विद्यमान आमदारांना तिकिट देण्यावर सकारात्मक चर्चा झाली आहे. उर्वरीत २५ जागांचा प्रस्ताव शिवसेनेकडून मांडण्यात आल्याची माहिती आहे. स्थानिक पक्षीय बलाबल, जातीय राजकारण पाहता या जागांवर तीन पक्षातील प्रमुख नेते बसून निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल आडीच तास बैठक झाली. या बैठकीमध्ये जागावाटपावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नसल्याची प्रतिक्रिया यावेळी थोरात यानी दिली आहे, तसेच लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होईल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.