विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा? सर्व काही स्पष्टपणे सांगितले

| Updated on: Nov 14, 2024 | 12:21 PM

मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे. लोकसभेला मी मराठा समाजाला सांगितले होते, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मराठा हा बुद्धिजीवी समाज आहे. त्यांना ताबडतोब ते लक्षात आले.

विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे यांचा कोणत्या पक्षाला किंवा अपक्षाला पाठिंबा? सर्व काही स्पष्टपणे सांगितले
Follow us on

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत यंदा महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये प्रमुख लढत आहे. परंतु या निवडणुकीत मराठा समाजाच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील निवडणूक रिंगणात उमेदवार उतरवण्याच्या तयारीत होते. परंतु त्यानंतर त्यांनी माघार घेतली. आता ते कोणाला पाठिंबा देतात? याकडे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीत मी मराठ्यांना हेच सांगितले आहे की, ज्यांना पडायचे त्याला पाडा, ज्यांना निवडून आणायचे त्यांना निवडून आणा. मी माझ्या वाक्यावर पहिल्यापासून ठाम आहे, आजही कायम राहणार आहे, आणि उद्याही राहणार आहे. राज्यभरातील मराठा समाज माझ्या ऐकण्यात आहे. मी जर म्हणालो यालाच मतदान करा, तर त्याचा अर्थ मी जात विकली असा होतो किंवा दावणीला बांधली असा होतो. पण मी माझ्या समाजाला कुणाच्याही दावणीला कसा बांधेल?

कोणालाच पाठिंबा नाही

महायुती आणि महाविकास आघाडीचे गावातील दोन-चार जण खोटे बोलतात की, अजूनही जरांगे पाटलांचा आदेश आला नाही. ती लोक संभ्रम पसरवतात. परंतु समाजात कुठलाही संभ्रम नाही. समाज करेक्ट कार्यक्रम करणार आहे. या कडीपासून त्या कडीपर्यंत पडणार आहे. मी राज्यात कोणालाही पाठिंबा दिलेला नाही, कोणत्या पक्षाला आणि अपक्षालाही मी पाठिंबा दिलेला नाही. निवडणूकमध्ये उभे असलेल्या कोणत्या उमेदवाराला मी पाठिंबा दिलेला नाही, असे मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

लोकसभेत सांगितले होते…

मराठा समाजाचा निवडणुकीत काय निर्णय असणार? त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाचा निर्णय झालेला आहे. लोकसभेला मी मराठा समाजाला सांगितले होते, ज्याला पाडायचे त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचे त्याला निवडून आणा. मराठा हा बुद्धिजीवी समाज आहे. त्यांना ताबडतोब ते लक्षात आले. लोक आम्हाला वेड्यात काढतात. मराठे एकमेकांच ऐकत नाहीत. एकत्र येत नाहीत. मराठ्यांना गोड बोललो की, मराठे फसतात. परंतु मराठ्यांनी दाखवून दिले की, कुणाचेही नाव न घेता मराठा समाज त्यांना धुळीस मिळूवू शकतो.

छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, राजांच्या राजगादीचा मी पहिल्यापासून सन्मान करतो आणि त्यांना सर्वांना माहीत आहे. मी आंबेडकर आणि छत्रपतींच्या राजगाद्यांचा सन्मान करतो. या राज्यातला मुलगा म्हणून खरं बोलणे अपेक्षित असते आणि मी ते बोलतो. मला मराठा समाजाची आरक्षणाची लढाई लढायची आहे आणि ती मला महत्त्वाची आहे.

नवीन सरकार येताच उपोषण

राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. त्यावेळी सरकार कोणाचे आले तरी, आम्ही आंदोलन करणार आहोत. आता सरकार कोणाचे येऊ द्या, मराठा समाजापुढे ते चिल्लर आहे. गरिबांची मागणी आरक्षण आहे, राजकारण नाही, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

दहा टक्के आरक्षण आम्ही तुम्हाला मागितले नाही नव्हते, असे मनोज जरांगे पाटील यांना अजित पवार यांना सुनावले. हे दहा टक्के आरक्षण टिकणारही नाही. जेव्हा 13% आरक्षण रद्द झाले होते. त्यावेळी मराठ्यांच्या मुलांचे नुकसान झाले होते, आम्हाला हक्काचे आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवणारच आहोत, असे त्यांनी म्हटले.