नाशिकः एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, असे म्हणत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरहरी झिरवळांचे कौतुक केले. सोबतच सत्तेचे काय खरे नसते. फक्त सामाजिक बांधिलकी जपा, असे आवाहनही त्यांनी केले. ते नाशिकमध्ये बोलत होते. गेल्या दोन दिवसांपासून पवार नाशिक दौऱ्यावर आहेत. साहित्य संमेलनाचा समारोपही काल त्यांच्या उपस्थितीत झाला.
सामाजिक बांधिलकी ठेवा
देशभरात आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा होत आहे. नाशिकमधल्या कार्यक्रमाची सुरुवातच शरद पवारांनी डॉ. बाबासाहेबांना वंदन करून केली. ते म्हणाले, आंबेडकरांनी देशाला फक्त घटना नाही, तर देशाला दिशा देण्याचे काम केले. शाहू, फुले, आंबेडकरांनी विज्ञानावर आधारित समाजकारण केले. त्या सूत्रावरचे काम आता मराठा विद्या प्रसारक शिक्षण मंडळाने केले. सत्ता येते आणि सत्ता जाते. याची चिंता करायची नसते फक्त सामाजिक बांधिलकी ठेवायची असते, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
एवढा भारी उपाध्यक्ष…
शरद पवार म्हणाले की, नाशिकच्या साखर कारखानदारीचे चित्र फारसा चांगले नाही. इथल्या साखर कारखानदारीसाठी पहिला पुढाकार श्रीराम शेटे यांनी घेतला. साखर कारखाण्यापासून विजेची निर्मिती करता येईल का, याचा विचार झाला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, आदिवासी भागातून आलेल्या झिरवाळ यांना विधानसभा उपाध्यक्ष पदाची जवाबदारी देण्यासाठी मी पक्षात चर्चा केली. तेव्हा ते विधानसभा चालवू शकतील की नाही, अशी शंका अनेकांनी व्यक्त केली. मात्र, पहिल्याच भाषणात त्यांनी सगळ्यांना जिंकून घेतले. एवढा भारी उपाध्यक्ष झाला नाही, असे नंतर सगळे म्हणाल्याचेही पवार म्हणाले.
नेमके कोण आहेत झिरवळ?
साधे राहणीमान, मितभाषी आणि अभ्यासू नेते म्हणून नरहरी झिरवळ यांची ओळख आहे. आदिवासी बहुल भागाचे प्रतिनिधीत्व करणारे झिरवळ अथक संघर्षातून पुढे आले आहेत. ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. दिंडोरी तालुक्यातील वनारे हे त्यांचे गाव. आदिवासी बहुल भागातील जनतेचे ते प्रतिनिधित्व करतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जवळचे आणि हक्काचे कार्यकर्ते म्हणून नरहरी झिरवाळ यांची ओळख आहे.त्यांचे शिक्षण कला शाखेपर्यंत झाले आहे. परंतु झिरवाळ यांची कौटुंबीक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात बिगारी काम करावे लागले. त्यानंतर दिंडोरी तहसील कार्यालयात लिपीक म्हणून कामाला लागले. परंतु, कामात मन न रमल्याने त्यांनी नोकरी सोडली. त्यानंतर त्यांनी गावात शेतीची कामे सुरू केली.
जनता दलातून सुरुवात
जनता दलाचे माजी खासदार दिवंगत हरिभाऊ महाले यांच्या ते संपर्कात आले आणि जनता दलातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवली. त्यात ते विजयी झाले आणि वनारे गावचे सरपंचही झाले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2001 साली ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर जिल्हा परिषदेवर निवडून आले. त्यानंतर 2004 च्या विधानसभा निवडणुकीचं राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिले आणि ते विजयी झाले. झिरवाळ यांच्या रूपाने दुसर्यांदा नाशिक जिल्ह्याला विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी सुरगाण्याचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार जीवा पांडू गावित यांना 2014 मध्ये विधानसभेचे हंगामी अध्यक्षपद म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला. शिवाय विधानसभेच्या उपाध्यक्षपदी पोहोचणारे ते नाशिकमधील पहिलेच नेते आहेत.
इतर बातम्याः