मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ जानेवारी २०२४ रोजी अटल सेतूचे उद्घाटन झाले होते. आधुनिक पायाभूत सुविधा, सुरक्षितता आणि कार्यक्षमतेचे प्रतीक ठरलेल्या या अत्याधुनिक सेतूमुळे कनेक्टिव्हीटीमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडून आलेच, त्याचप्रमाणे प्रवासी सुरक्षितता आणि कार्यक्षमता या निकषांवरही नवे मापदंडही प्रस्थापित झाले आहेत.
गेल्या वर्षभरात अटल सेतूवरून ८३,०६,००९ वाहने धावली. या सेतूमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक सुरळीत आणि वेगवान झाला आहे. या सेतूवरून दररोज सरासरी २२,६८९ वाहने प्रवास करतात, तर १४ जानेवारी २०२४ या एका दिवसात सर्वाधिक ६१,८०७ वाहनांनी या सेतवरून प्रवास केला. अटल सेतूवरील भक्कम वाहतूक व्यवस्थापन आणि प्रगत वाहतूक व्यवस्थापन प्रणाली (ATMS), अग्निशमन वाहने (FRVs), देखभाल पथके आणि गस्त पथके यांचा समावेश असलेल्या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीमुळे या सेतूवरील प्रवास सुरळीत होण्याची खातरजमा करण्यात आली आहे. तसेच, अनुचित घटना घडल्यास तत्काळ कार्यवाही करण्यासाठी यंत्रणा सज्ज असते. वाहतूक निरीक्षण, वैद्यकीय मदत आणि अडथळे दूर करण्यासाठी तीन विशेष पथके २४ तास कार्यरत असून, त्यामुळे उच्च सुरक्षा मानक राखले आहेत.
– कार: ७,७२८,१४९
– एलसीव्ही/मिनी बस: ९९,६६०
– बस/२-ॲक्सल ट्रक: १,१७,६०४
– एमएव्ही (३-ॲक्सल ): १,९९,६३६
– एमएव्ही (४-६ ॲक्सल ) : १,६०,०६१
– ओव्हरसाईज वाहने: ८९९
अटल सेतू हे महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आमच्या सरकारच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. अवघ्या एका वर्षात, या सेतूवरून ८० लाखांहून अधिक वाहने धावली आणि या भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात मोठे योगदान दिले आहे. हा महत्त्वाचा टप्पा गाठल्याबद्दल मी एमएमआरडीएच्या टीमचे त्यांच्या अथक प्रयत्न आणि दूरदृष्टीबद्दल अभिनंदन करतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
अटल सेतू हा केवळ एक पूल नाही, तर मुंबई महानगर प्रदेशातील शहरी वाहतुकीची व्याख्या नव्याने करणारी जीवनवाहिनी आहे. या सेतूचे उत्तम संचालन आणि यंत्रणा यावरून प्रगत वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींच्या कार्यक्षमतेचे महत्त्व अधोरेखित होते. हा टप्पा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असून भविष्यातील पायाभूत सुविधांच्या उत्कृष्टतेसाठीचे एक महत्त्वाचे एक पाऊल आहे असे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे
अटल सेतूच्या एक वर्षाच्या यशस्वी प्रवासाच्या निमित्ताने, हे यश साध्य करण्यात योगदान दिलेल्या आमच्या टीम्स आणि भागधारकांचे मनःपूर्वक आभार मानतो. सुरक्षिततेसंदर्भात या सेतूची उत्तम कामगिरी आणि कार्यक्षमतेमुळे पायाभूत विकासात नवकल्पना आणि शाश्वततेवर एमएमआरडीएतर्फे भर देण्यात असल्याची भूमिका अधोरेखित होते. अगदी काही मिनिटांत मुंबईत पोहोचणे सुलभ करण्याच्या उद्दिष्टाने या भागातील कनेक्टिव्हिटी अधिकाधिक सक्षम करण्याचा आमचा निर्धार आहे असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी म्हटले आहे.
अटल सेतूची यशोगाथेतून मुंबई महानगर प्रदेशासाठी शाश्वत, सुरक्षित आणि कार्यक्षम पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या एमएमआरडीएचा दृष्टिकोन अधोरेखित होतो. गेल्या वर्षभरातील या पुलाच्या उत्कृष्ट कामगिरीने पुढील वर्षांमध्ये अधिक मोठी यशस्वी पावले उचलण्यासाठी पाया घातला गेला आहे.