उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: Feb 02, 2021 | 6:58 PM

पक्षाची तातडीची बैठक आटोपून घरी परतलेल्या मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना उल्हासनगरामध्ये घडली आहे. (Attack on MNS party worker in Ulhasnagar).

उल्हासनगरमध्ये मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Follow us on

कल्याण (ठाणे) : पक्षाची तातडीची बैठक आटोपून घरी परतलेल्या मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना उल्हासनगरामध्ये घडली आहे. लूटीच्या इराद्याने हल्लेखोरांनी हा प्रकार केला की राजकीय वैमनस्यातून हा प्रकार घडला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात लूटीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Attack on MNS party worker in Ulhasnagar).

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी काल (1 फेब्रुवारी) मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला. त्याच पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ या शहरातील पक्षातील सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. ही बैठक रात्री 9 वाजता संपली. बैठकीत उल्हासनगरचे मनसे उपाध्यक्ष प्रदीप घोडसे हे देखील उपस्थीत होते. बैठक आटोपल्यावर ते उल्हासनगरातील त्यांच्या कार्यालयात गेले.

कार्यालय बंद करुन घरी परतत असताना रस्त्यात त्यांना एक मित्र भेटला. दरम्यान, प्रदीप यांना एका व्यक्तीचा फोन आला. ते रस्त्यावर एका ठिकाणी थांबून फोनवर बोलते होते. यावेळी बाईकवरुन दोन तरुण आले. त्यापैकी एकाने त्यांचा गळा दाबला आणि त्यांना 15 फूटापर्यंत फरफटत नेले. या दरम्यान मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न झाला. या झटापटीत प्रदीप यांना हाताला दुखापत झाली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले (Attack on MNS party worker in Ulhasnagar).

या घटेनेबाबत प्रदीप घोडसे यांनी प्रतिक्रिया दिली. “आम्ही पक्षामार्फत जनतेची कामे करतो. त्यात दुश्मनी होते. एका ठिकाणी कार्यालयाचे प्रकरण सुरु आहे. त्यातूनच हा हल्ला झाल्याची शक्यता आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणी मोबाईल लूटीच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी लवकर तपास करुन काय सत्य आहे ते बाहेर आणले पाहिजे”, असं त्यांनी सांगितलं.

याआधी अंबरनाथ शहरात मनसे उप शहर अध्यक्षावर हल्ला

ठाणे जिल्ह्यात याआधीदेखील मनसे पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. 28 ऑक्टोबर 2020 रोजी अंबरनाथ शहराचे मनसेचे उप शहराध्यक्ष राकेश पाटील यांची भररस्त्यात धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणाचा पोलिसांनी 13 दिवसात मुख्य आरोपीला अटक केली होती.

संबंधित बातमी :

मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, 13 दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडा

अंबरनाथमध्ये भररस्त्यात मनसे शहर उपाध्यक्षावर टोळक्याचा हल्ला; धारदार शस्त्रांनी वार, उपचारादरम्यान मृत्यू