अकोला जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. अकोल्यात पृथ्वी देशमुख यांच्यावर सराईत गुन्हेगारांकडून प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे कार्यकर्ते अकोला पोलीस ठाण्यात जमले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केल्याची माहिती समोर येत आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचीदेखील माहिती मिळत आहे. संबंधित घटनेचा सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आला आहे. या प्रकरणी काय-काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांचे सुपुत्र पृथ्वी देशमुख यांच्यावर काही सराईत गुन्हेगारांनी अकोल्यात हल्ला केला. अकोला शहरातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. पृथ्वी देशमुख हा कपड्याच्या दुकानावर उभा असताना काही सराईत गुन्हेगारांनी त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तर या हल्लादरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण झाली.
दरम्यान, आमदाराच्या मुलावर हल्ल्या झाल्याची माहिती मिळताच ठाकरे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे सर्व जण कृषी नगर भागातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तक्रार दाखल करण्यासाठी स्वतः आमदार नितीन देशमुख आणि शिवसैनिक पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. तर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर वरिष्ठ पोलीस अधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
नितीन देशमुख यांनी या घटनेनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “माझा मुलगा आहे म्हणून प्रश्न नाही तर या शहरातला कोणताच मुलगा आणि मुलगी सुरक्षित नाही. आम्ही याबाबत वारंवार एसपींना कल्पना दिली आहे. काही दिवसांपूर्वी 15 वर्षाच्या तरुण विद्यार्थ्याची कारण नसताना हत्या झाली होती. तो जेवणाचा डब्बा घेऊन चालला होता. दोन मुले वाढदिवस साजरी करत होते, त्या तरुणावर चाकूचा हल्ला झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. असे अनेक हल्ले होत आहेत. अनेक गुन्हेगारांच्या टोळ्या शहरात सक्रिय आहेत. जवाहरनगरमध्ये अक्षरश: चाकू लावून खंडणी घेतली जाते, असाच प्रकार माझ्या मुलासोबत झाला. त्याला शिवीगाळ केली. नंतर खंडणी मागितली. ती दिली नाही म्हणून आठ ते दहा जणांनी मिळून मारहाण केली. फरशी डोक्यात टाकण्याचा प्रयत्न झाला. मी अनेक दिवसांपासून सांगतोय की, क्राईम वाढलाय. दखल घ्या. माझ्या मुलासोबत असा हल्ला होऊ शकतो, मग सर्वसामान्यांचं काय?”, असा सवाल नितीन देशमुख यांनी केला.