औरंगाबादः अशांतता होते म्हणून पुतळे, समाध्या बंद करायच्या असतील तर तुम्हाला या देशातल्या महापुरुषांचे पुतळे आणि समाध्या बंद कराव्या लागणार आहेत का? इतिहासापासून शिकावं, समजूतदार व्हावं हे ठीक पण इतिहासापासून पळून जावं हे कितपत योग्य आहे? आणि त्यात शहाणपण ते काय? असा जळजळीत सवाल राजकीय विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी केला आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी अकबरुद्दीन औवैसी (Akbaruddin Owaisi) यांच्यासोबत औरंगाबादेतील औरंगजेबाच्या कबरीचं (Aurangzeb Tomb) दर्शन घेतलं आणि राज्यभरातील हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला. काहींनी तर ही कबर उखडून टाकण्याची भाषा केली. यामुळे खुलताबाद येथील कबरीला धोका निर्माण झाल्याची भावना स्थानिकांमध्ये बळावली. परिणाम आज 19 मे रोजी भारतीय पुरातत्त्व विभागानं औरंगाबादमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर पुढील पाच दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या काळात पर्यटक अथवा सामान्य नागरिकांना ही कबर पहायला जाता येणार नाही. मात्र एखाद्या गोष्टीवरून वादंग होत असेल तर तिला सुरक्षा देणारी यंत्रणा वाढवण्याऐवजी अशा प्रकारे तिच्यावर थेट पडदा टाकणं संतापजनक असल्याची प्रतिक्रिया एका वर्गातून उमटत आहे.
संभाजीराजेंची हत्या करणारा, सत्तेसाठी स्वतःच्या भावाचा क्रूर पद्धतीने खून करणाऱ्या औरंगजेबाची कबर ठेवायचीच कशाला, अशी भूमिका गेल्या काही दिवसात अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी घेतली. त्यामुळे या कबरीवर कधीही हल्ला होऊ शकतो, अशी भीती कबर समितीतील लोकांना वाटू लागली आहे. दोन दिवसांपूर्वी स्थानिकांनी स्वतःच निर्णय घेत येथील कबर बंद केली होती. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत ती पुन्हा पर्यटकांसाठी खुली केली. मात्र कबरीचं संरक्षण करण्यासाठी काही दिवस ती बंदच ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर पुरातत्त्व खात्याने पुढील पाच दिवस औरंगजेबाची कबर पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय़ घेतला आहे. यावर समाजवादी विचारसरणीच्या लोकांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
राजकीय विश्लेषक आणि समाजवादी विचारवंत विश्वंभर चौधरी यांनी सरकारच्या या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया दिली. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, ‘भारतीय पुरातत्त्व विभागाचा हा निर्णय चमत्कारीक आहे. औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता, पण आयुष्याची 27 वर्ष त्यानं मराठी देशी काढली. हा इतिहास महत्त्वाचा नाही का? औरंगजेबाची कबर सरकार संरक्षित करू शकत नसेल तर हे केंद्र सरकार फारच दुर्बल आहे, असं म्हणलं पाहिजे. किंवा स्वतःला आवडत नसलेला इतिहास मारण्याची कावेबाजी असं म्हणलं पाहिजे. आणि पुरातत्त्व विभाग काय काय बंद करणार, हाही विषय आहेत…
पूर्ण पोस्ट पुढील प्रमाणे-
दरम्यान, औरंगजेबाची कबर पुरातत्त्व विभागानं काही दिवसांकरिता बंद केल्यानंतरही राजकीय पक्षांनी श्रेयवादासाठी लढाई सुरु केली आहे. आम्ही इशारा दिला, आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर बंद करावी लागली, अशा प्रतिक्रिया हिंदुत्ववादी पक्षांकडून येत आहेत.