औरंगाबादः शहरात राहणाऱ्या बहिणीला भेटून परत गावाकडे जाण्यासाठी निघालेले भाऊ बशीर अहमद शेख यांचा सिद्धार्थ उद्यानात (Siddharth Garden) रविवारी रहस्यमय मृत्यू झाला. रविवारी सकाळी सिद्धार्थ उद्यानात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या (Suicide) वाटत असली तरीही मृतदेहाच्या शरीरावर कटरने वार केल्याच्या जखमा पोलिसांना आढळून आल्या आहेत. त्यामुळे ही आत्महत्या आहे की घातपात आहे, असा संशय पोलिसांना (Aurangabad police) आहे. उद्यानातील मत्स्यालयाजवळील झुडुपात त्यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या शरीरावर जखमा होत्या. सकाळी उद्यानात फिरण्यासाठी आलेल्यांना हा मृतदेह दिसला. त्यानंतर तत्काळ उद्यानातील कर्मचाऱ्यांना ही माहिती देण्यात आली. औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे. क्रांती चौक पोलिस ठाण्यात सदर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की, बशीर हे चार महिन्यांपूर्वी कन्नड तालुक्यात सेवा बजावून निवृत्त झालेले तलाठी होते. ते गंगापूर तालुक्यातील शिंगीपिंप्री येथे कुटुंबासह रहात होते. कार्यालयीन कामासाठी ते शनिवारी कन्नडला गेले. तेथून औरंगाबादेतील बहिणीच्या घरी आले. रात्री मुक्काम करून रविवारी सकाळी 10 वाजता गावाकडे जाण्यासाठी निघाले. मात्र ते गावी परतलेच नाहीत. सिद्धार्थ उद्यानातील मत्स्यालयाजवळच्या झाडांमध्ये सुरक्षा भिंतीच्या गेटला त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी कागदपत्रांवरून ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना यासंबंधी म ाहिती दिली.
बशीर यांचा मृतदेह ज्या ठिकाणी आढळला, त्या ठिकाणी पिशवीत शेख यांचे कार्यालयीन कागदपत्र होती. घटनास्थळी एक धारदार चाकू पोलिसांना आढळून आला. कार्यालयात केलेले अर्जदेखील आढळून आले. नोकरीसंदर्भात केलेले हे अर्ज होते. तसेच सेवानिवृत्तीच्या रकमेसाठी ते अनेकदा कार्यालयात चकरा मारत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यामुळे ही आत्महत्या मानली तरीही पिशवीजवळच चाकू आढळल्याने दुसऱ्या दिशेनेही पोलीस तपास सुरु आहेत.