औरंगाबाद: मालमत्ता कर हा औरंगाबाद महापालिकेचा (Aurangabad Municipal Corporation) मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. मात्र हा मुख्य स्रोतच आटत चालला असून याकडे पालिका प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. महापालिका हद्दील मालमत्ता कराची वसुली वाढवण्यासाठी प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) विविध प्रयोग राबवत आहेत. मात्र यानंतरही करवसुलीला (Tax Recovery) गती मिळण्याची चिन्ह दिसत नाहीत. मागील पाच महिन्यात केवळ 15 टक्केच कर वसुली झाली आहे. हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी आणखी 7 महिने शिल्लक असली तरीही त्या काळातही वसुलीचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.
मालमत्ता करवसुलीत मनपा प्रशासन सपशेल फेल होण्याची स्थिती दिसून येत आहे. मागील काही वर्षांचा थकबाकीचा आकडा सारखा वाढताच दिसून येत आहे. तर वसुलीची आकडेवारीही दिवसेंदिवस घटलेली दिसून येत आहे. मध्यंतरी डॉ. निपुण विनायक यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागनिहाय कर्मचार्यांची सक्षम यंत्रणा उभी करून कर वसुली वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र यंत्रणेच्या कुचकामी मानसिकतेमुळे त्यांना यश आले नाही. त्यांच्यानंतर प्रशासक आस्तिककुमार पांडेय हे मागील दोन वर्षांपासून कराची वसुली वाढवण्यासाठी विविध प्रयोग राबवत आहेत. मात्र मध्येच कोरोनाने धडक दिली आणि त्यांच्या प्रयत्नांना काही दिवस ब्रेक लागला. आता कोरोनाची दुसरी लाटही गेली असून कर वसुलीला गती देण्यासाठी पांडेय यांनी मालमत्ता कर वसुली विभागाचे त्रिभाजनाचा प्रयोग हाती घेतला आहे.
महापालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी करवसुलीसाठी नवी यंत्रणा आखून दिली आहे. यात प्रभागनिहाय वसुलीची जबाबदारी निश्चित केली आहे. या विभागाचे त्रिभाजन केले आहेत. त्यानुसार आता कर वसुलीची जबाबदारी उपायुक्त सौरभ जोशी, अपर्णा थेटे आणि संतोष टेंगळे यांच्यावर असून यांना प्रत्येकी तीन प्रभागांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आयुक्तांच्या या प्रयोगानंतर तरी वसुलीला गती मिळणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ऑनलाइन कर भरण्यासाठी शहभरात 75 ठिकाणी किऑस्क् मशीनही लावल्या जात आहे. मात्र दुसरीकडे पालिकेची प्रभागनिहाय काम करणारी यंत्रणाच अपुरी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
2021-22 या आर्थिक वर्षांत मागील साडेपाच महिन्यात केवळ 14.84 टक्के एवढीच कर वसुली झाली आहे. 1 एप्रिल ते 1 सप्टेंबरपर्यंत 69.58 कोटी रूपये मालमत्ता कराच्या स्वरुपात वसूल झाले आहेत. यंदाची चालू व मागील थकबाकी असे मिळून 468.57 कोटींचे टार्गेट प्रशासनाने ठरवले आहे. ते आगामी सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता कमीच आहे.
1 एप्रिल ते 1 सप्टेंबर या काळात पालिकेला शहरातून पाणीपट्टीचीही अपेक्षित वसुली करता आलेली नाही. चालू सह थकीत पाणीपट्टी असे एकूण 108.57 कोटी रूपये यंदा पाणीपट्टीतून पालिकेला अपेक्षित आहे. त्यातून पाच महिन्यात केवळ 10.81 कोटी रूपये वसुली झाली आहे. ही टक्केवारी 9.96 टक्के एवढी नोंदली गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली
(Aurangabad Municipal Corporation get only 15% tax recovery till today)
इतर बातम्या-
लिचेडच्या पाण्याचे औरंगाबाद महापालिका करणार शुद्धीकरण, कचऱ्यापेक्षाही तिपटीने घातक लिचेड