औरंगाबादः जिल्ह्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि दरोड्यांचे सत्र वाढले आहे. त्यामुळे गाव-खेड्यांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र आम्ही तुमच्या पाठिशी आहोत, फक्त एक हाक मारा, असा संदेश देत ग्रामीण पोलिसांनी नवी शक्कल लढवली आहे. ग्रामस्थांनी हाक पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी अत्याधुनिक सायरनही दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातर्फे हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला.
कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी पोलीस ठाणे परिक्षेत्रात हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. याअंतर्गत ताडपिंपळगाव, देवगाव, जेहूर, औराळा, टाकळी या मोठ्या गावांसह लहान गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 15 जणांना सायरनचे वितरण करण्यात आले.
आपले घर किंवा वस्तीवर मध्यरात्री कुणी अनोळखी आला, त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास किंवा परिसरात एखादी गुन्ह्याची घटना घडल्यास घराच्या छतावर लावलेला सायरन वाजवण्याच्या सूचना गावकऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाबद्दल बोलताना जेहूर येथील नागरिक म्हणाले, शेतात राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सायरन खूप फायदेशीर आहे. देवगाव रंगारी येथील देविदास जाधव यांच्या घरावर दोन सायरन बसवण्यात आले आहेत. याचा आवाज 1 ते दीड किमीपर्यंत जातो.
देवगाव रंगारी पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्यासाहेब भालेराव म्हणाले, पोलीस महानिरीक्षकांची ही मूळ संकल्पना आहे. शेत, वाडी वस्त्यांवर जी एकटी कुटुंबे राहतात, त्यांच्या सुरक्षिततेसाठी याचा फायदा होत आहे. सायरनचे बटण दाबताच परिसरातील लोक, पोलीस मदतीला येऊ शकतात. यामुळे गुन्ह्यांना आळा बसेल.
इतर बातम्या-