औरंगाबादः नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडात औरंगाबादचे आमदार संदिपान भूमरेदेखील (Sandipan Bhumre) शामिल आहेत. भूमरे यांच्या बंडाविरोधात औरंगाबाद येथील शिवसैनिकांनी (ShivSainik) तीव्र नाराजी दर्शवली. भुमरे यांच्या कार्यालयाजवळील बॅनरवरील फोटोला शिवसैनिकांनी काळे फासले. शहरातील गारखेडा परिसरातील कार्यालयाबाहेर भूमरेचं बॅनर लावलेलं आहे. शुक्रवारी रात्री अंधाराचा फायदा घेत शिवसैनिकांनी यातील भूमरेंच्या फोटोवर काळा रंग टाकून आपला निषेध व्यक्त केला. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे आणि राज्यातील अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेविरोधात बंड पुकारले. तसेच महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आम्हाला रहायचं नाही, अशी भूमिका घेतली. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मोठं संकट कोसळलं असून राज्यभरातील शिवसैनिक अस्वस्थ आहेत.
औरंगाबादमधून पाच बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात शामिल झाले आहेत. हे आमदार सध्या गुवाहटीत असून त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या जीवाला धोका आहे, अशी शक्यता वर्तवली आहे. तसेच उद्धव ठाकरेंशी बंड पुकारल्यामुळे नाराज शिवसैनिकांचा असंतोष अनेक प्रकारे उफाळून येत आहे. याच पार्श्वभूमीवर बंडखोर आमदारांच्या औरंगाबाद जिल्ह्यातील कार्यालयांना पोलीस सुरक्षा देण्यात येणार आहे.
दरम्यान, औरंगाबादमधील रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे हे शिवसेनेशी बंडखोरी करत गुवाहटीत दाखल झाले आहेत. तर इकडे शुक्रवारी औरंगाबादमधील म्हाडाच्या लॉटरीमध्ये त्यांना घर मिळाल्याची बातमी आली. आमदारांना अशा प्रकारे सवलतीत घर मिळाल्यामुळे औरंगाबादच्या सोशल मीडियातूनही त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे.
एकनाथ शिंदे यांच्याविरोधात परभणी येथील शिवसैनिकही आक्रमक झाले. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील शिवाजी चौकात हे आंदोलन करण्यात आलं. शिवाजी चौकातील रस्त्यावर काही शिवसैनिक बसले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा जयजयकार केला. तर एकनाथ शिंदे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. एवढच नाही तर गाढवांना गुलाबराव पाटील आणि एकनाथ शिंदे यांचा फोटो लावून हे शिवसैनिकांनी आंदोलन केलं.