औरंगाबाद: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, मैदानं बंद असल्यानं लहान मुलांच्या करमणुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात हातातलं खेळण्याचं साधन म्हणून मोबाइल हाच लहान मुलांचा मित्र झाला आहे. मात्र मोबाईलच्या दुष्परिणामांमुळे मुलांना मोबाईल द्यायचा तरी किती वेळ, असा प्रश्न पालकांसमोर उभा असतो. पालक आणि मुलांमधील यासंबंधीच्या चर्चा नेहमी समोर येत असतात. मोबाइल विकत घेऊन द्या, असा हट्ट करणाऱ्या मुलाने घर सोडल्याची घटना नुकतीच औरंगाबादमध्ये (Aurangabad, Maharashtra) घडली.
जिल्ह्यातील मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागातील एका 12 वर्षीय मुलानं गेल्या काही दिवसांपासून मोबाइल विकत घेण्यासाठी आईकडे तगादा लावला होता. आईने त्याला मोबाइल देण्यासाठी नकार दिला. रविवारी मात्र शॉपीमध्ये जाऊन मोबाइल विकत घ्या, असा हट्ट त्याने सुरू केला. या हट्टाला कंटाळून आई आणि वडिलांनी त्याला रागावले. या रागाच्या भरात त्याने घर सोडले.
नाराज झालेला मुलगा घरातून निघून गेला असला तरी थोड्या वेळात परत येईल, असे पालकांना वाटले. पण सकाळचे अकरा वाजून गेल्यावरही तो परत न आल्याने त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मित्र, नातेवाईकांकडेही तो सापडला नाही. अखेर घाबरलेल्या आई-वडिलांनी दुपारी साडे तीन वाजता मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ त्याचा शोध सुरु केला.
पोलिसांनी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. परिसरात सर्वत्र संबंधित मुलाचे छायाचित्र पाठवले. पोलिसांच्या मोठ्या टीमने सलग तीन तास शोध घेतल्यानंतर निघून गेलेला मुलगा सापडला. घरातून निघून गेल्यानंतर तो बराच वेळ मुकुंदवाडी रेल्वेस्थानकावर थांबला. त्यानंतर पलीकडील राजनगर भागात फिरत असल्याचे कळताच उपनिरीक्षक वाघ यांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिस स्टेशनमध्ये जबाब नोंदवून घेतल्यावर संबंधित मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
सध्या मुलांना नाही ऐकायची सवय राहिलेली नाही. त्यामुळे पालकांनी मुलांना वास्तविक परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे. खोटे प्रॉमिस केल्यावर मुले त्यावर विश्वास ठेवतात. पालकांनाही त्या वेळापुरते आपले चांगले चित्र उभे राहिले, असे वाटते. मात्र प्रॉमिस पाळले नाही तर मुलांचा अपेक्षाभंग होतो आणि त्यातूनच अशा घटना घडतात. मुलं नेहमी पालक आणि स्वतःची तुलना करत असतात. पालकांना मोबाइल, लॅपटॉप असतो, मग मलाही मिळाला पाहिजे, अशा भूमिकेत ते असतात. मात्र मुलं आणि पालक यात फरक असतो, पालकांना ऑफिसच्या कामासाठी या गोष्टी वापराव्या लागतात, ही जाणीव पालकांनी वारंवार करून दिली तर मुलांना वास्तवाचं भान राहिल, असा सल्ला औरंगाबादमधील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा अष्टपुत्रे यांनी दिला. (12 years boy left home after parents refused to get him a smartphone)
इतर बातम्याः
Aurangabad Crime : ‘त्या’ खवले मांजर चोरांचा जामीन नाकारला, हर्सूल कारागृहात रवानगी
रस्त्यावर चालताना मोबाईल घेऊन पळायचे, औरंगाबादेत दोन अट्टल चोरांना बेड्या