जालना | 2 सप्टेंबर 2023 : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात काल मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी आंदोलन केलं होतं. या आंदोलनावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यामुळे यावेळी एकच गोंधळ माजला. यावेळी अनेकांना मार लागला आहे. अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचे संपूर्ण राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. तर, दुसरीकडे पोलिसांनी कालच्या आंदोलनातील 350 आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या आंदोलकांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल करण्यात आल्याने आंदोलक अधिकच खवळले आहेत.
अंतरवाली सराटी गावात काल झालेल्या राड्यानंतर आज पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. 350 मराठा आंदोलनकर्त्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी भादंवि कलम 307, 333, 332, 353, 427, 435, 120 (ब), 143, 147, 148, 149९ मुंबई पोलीस कायद्याचे कलम 135 आणि सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम कलम 3 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आंदोलक अधिक खवळले आहेत.
दरम्यान, कालच्या घटनेचे आजही जालन्यात पडसाद उमटले आहेत. जालना शहरातील अंबड चौफुली येथे मराठा संघटनांनी अंतरवाली सराटी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्त रास्ता रोको केला. यावेळी हिंसक झालेल्या जमावाने खासगी वाहनांची तोडफोड केली. पोलिसांनी यावेळी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यावर लाठीचार्ज करत अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.
औरंगाबाद परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जालन्याचे जिल्हाधिकारी कृष्णनाथ पांचाळ यांनी कालच्या घटनेत जखमी झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली. काल लाठी चारच्या दरम्यान जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची दोन्ही अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट.
कालचा लाठीचार्ज अत्यंत दुर्देवी घटना आहे. आरक्षण संदर्भात सामान्य नागरिकांमध्ये खदखद आहे. घटनेने दिलेल्या अधिकारानुसार आम्हाला उपोषण करण्याचा अधिकार आहे. पण अशा पद्धतीने पोलिसांनी येऊन लाठीचार्ज करावा हे योग्य नाही. आमचा वाद पोलिसांशी नाहीतर सरकारशी आहे. पोलिसांना पुढे करून अशाप्रकारे आंदोलन बंद करणे योग्य नाही. आम्हाला वाईट वाटतं की मुख्यमंत्री आणइ उपमुख्यमंत्री मराठा आहेत. त्यांनी आमच्या भावना समजून घेणे गरजेचं होतं. पण आडवा कोण येतोय? असा सवाल मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी केला आहे.
जालन्यात अश्र धुरांच्या नळकांड्या सोडणं गरजेचं नव्हतं. गोळ्या चालवणं गरजेचं नव्हतं. हे प्लॅनिंग होतं का? हा निर्णय अधिकाऱ्याने घेतला का? परिस्थिती तशी होती का? की सरकारने सूचना दिल्या? याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली.