औरंगाबाद: शहरात रेल्वे स्थानकावर (Aurangabad Railway Station) आलेला 39 किलोचा गांजा उस्मानपुरा पोलिसांच्या पथकाने पकडला. औरंगाबादेत शुक्रवारी सकाळच्या सुमारास ही कारवाई झाली. या कारवाईत दोन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आले. आंध्रप्रदेशातील (Andhra Pradesh) विशाखापट्टणम् येथून हा गांजा औरंगाबादेत आणला गेल्याचे पोलिसांच्या (Aurangabad Police) चौकशीअंती समोर आले.
उस्मानपुरा पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक राहुल सूर्यतळ यांना रेल्वे स्टेशनवर आंध्रप्रदेशातून गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती त्यांच्या बातमीदाराकडून मिळाली होती. त्यानंतर निरीक्षक गीता बागवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सर्व परवानग्या मिळवत सापळा रचला. मिळालेल्या बातमीनुसार एक पुरुष आणि दोन महिला शुक्रवारी नऊ वाजता रेल्वेस्थानकातील पार्किंगमध्ये प्रवासी बॅगसह दाखल झाले. या आरोपींकडे चार बॅग होत्या. या सर्व बॅगची झाडा-झडती घेतली असता, त्यात प्लास्टिकच्या आवरणात 19 पाकिटं आढळून आली. त्यात तब्बल 39 किलो गांजा आढळला.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणणाऱ्यांना पकडले. मात्र पकडण्यात आलेल्या तिघांची चौकशी कशी करायची, हाच प्रश्न पोलिसांसमोर होता. कारण या तिघांनाही तेलगूशिवाय इतर कोणतीही भाषा येत नव्हती. आरोपींना त्यांचे नाव काय, हा प्रश्नही मराठीतून समजत नव्हता. त्यामुळे पोलिसांना त्यांच्याशी संवाद साधणे कठीण झाले. अखेर तेलगू भाषा येत असलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन दुभाषिकाच्या माध्यमातून आरोपींची चौकशी करण्यात आली. तसेच कोठडीत असतानाही या दुभाषिकाची मदत घेतली जाऊ शकते.
विशाखापट्टणम् येथून आलेला हा गांजा सुमारे 2 लाख 73 हजार रुपये किंमतीचा आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये गोविंदा मनी आरली, लाऊ अम्मा रामू आरली आणि मनय्या अप्पाराव पिल्ले यांचा समावेश आहे. तीन आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली.
मागील दोन वर्षांमध्ये नारेगाव, सिटी चौक, जिन्सी परिसरात विशाखापट्टणमवरून येणारा मोठा गांजा पकडला गेला. शहरातील मातब्बर तस्करांनी विशाखापट्टणम येथे बटाईने गांजाची शेती केली आहे. यापूर्वीच हा प्रकार लक्षात आला आहे. तस्करांनी वेगवेगळी शक्कल लढवूनही शहर पोलिसांनी हा गांजा पकडल्याने मध्यंतरीच्या काळात तस्करांच्या रॅकेटवर मोठा परिणाम झाला. त्यामुळे आता रेल्वेद्वारे प्रवासी म्हणून मजुरांना पाठवून तस्करी सुरू केली. यात सदर प्रवासी रेल्वेस्थानकावर उतरल्यानंतर त्यांना बाबा चौकात उतरण्यास सांगितले जाते. त्यानंतर दुसऱ्या रिक्षात बसण्यास सांगून सदर एजंट रिक्षाचालकाला थेट पत्ता सांगून त्यांना तेथे घेऊन येण्यास सांगतो. पहिल्यांदाच गांजा तस्करीचा हा प्रकार समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
एकदा गांजा पोहचवल्याने मिळतात 12 हजार
विशाखापट्टणम येथील तोडवा, नलंका पिल्ली येथील हे आरोपी असून तेथे ते मजुरी करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील अनेक दिवसांपासून ते औरंगाबादमध्ये तेथील गांजा व्यापाऱ्यांकडून गांजा घेऊन शहरातील एजंटला देण्यासाठी येत आहेत. एका टूरसाठी त्यांना बारा ते पंधरा हजार रुपये मिळतात, त्या व्यतिरिक्त रेल्वेचे तिकीट औरंगाबादचा एजंट काढून देतो.
इतर बातम्या-