औरंगाबाद: राज्य शासनाच्या सूचनेनुसार औरंगाबाद महापालिकेत (Aurangabad Municipal corporation) ‘मिशन कवच कुंडल’ मोहिम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा (Corana Vaccination) वेग दुपटीने वाढवण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. महापालिकेने केलेल्या नियोजनानुसार, काल रविवारीदेखील मोठ्या प्रमाणावर लसीकरण करण्यात आले. नागरिकांनीही या केंद्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील कर्णपुरा आणि सिडकोतील दुर्गा माता मंदिरात मोफत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी या दोन्ही ठिकाणी एकूण 167 भाविकांनी लस घेतली आहे.
कोविड लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे ,आरोग्य संचालक डॉक्टर अर्चना पाटील यांनी मिशन कवच कुंडल अंतर्गत दिनांक 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान ही विशेष मोहिम राबविण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार, रविवारी सुट्टी असतानाही महानगरपालिकेच्या 40 आरोग्य केंद्रात व शहरातील 21 खाजगी खाजगी रुग्णालय कर्णपुरा मंदिर दुर्गा मंदिर अशा अशा एकूण 69 ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात येतआहेत. मिशन कवच कुंडल मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने जनजागरण करण्यात येत आहे, अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी दिली.
कोविड लसीकरण मोहीम शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी मिशन करण्यासाठी महापालिका विशेष प्रयत्न करत आहे. गर्दीच्या व विविध ठिकाणी लसीकरणासंबंधी जनजागृती करणारी शिबिरे घेण्यात येत आहेत. कॉलनीतून कचरा गोळा करत फिरणाऱ्या घंटागाडीवरही मिशन कवच कुंडल ध्वनिफीत ऐकण्यात येत आहे. या माध्यमातून नागरिकात जनजागृती करण्यात येत आहे. या मोहिमेत शहरातील विविध सामाजिक संस्था तसेच धर्मगुरूंनीदेखील सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे नवीन 8 रुग्ण आढळले. यात शहर 3, तर ग्रामीणच्या 5 जणांचा समावेश आहे. दिवसभरात दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. रविवारी 14 जणांना (मनपा 6, ग्रामीण 8) सुटी देण्यात आली. आता जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 1,48,866 झाली. त्यापैकी 1,45,127 जण बरे होऊन घरी गेले आहेत. बळींचा आकडा 3,588 झाला आहे. सध्या 151 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
इतर बातम्या-
हनुवटीवरचे मास्क खुंटीवर.. ‘महाराष्ट्र बंद’ वाले मोर्चेकरीही विना मास्कचे.. पालिकेची कारवाई थंडावली