नांदेड: महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठांपैकी एक असलेल्या माहूगडासाठी (Mahujgad Renukamata) लवकरच ‘रोप वे’ चे काम पूर्ण करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (PWD Minister Ashok Chavan) यांनी दिली. या शक्तीपीठाचा लवकरच कायापालट होईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. ‘रोप वे’ उभारण्यासंदर्भात राज्य शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘वॅपकॉस लिमिटेड’ (wapcos limited) मध्ये नुकताच करार झाला आहे. या निमित्ताने त्यांनी माहिती दिली. नाशिकमधील सप्तशृंगी देवीच्या गडावर जाण्यासाठीचा रोप वे यशस्वी झाल्यानंतर आता माहूर गडावरही अशी सुविधा झाली तर भाविकांना देवीचे दर्शन घेणे अधिक सोयीचे होईल. काही दिवसांनी नवरात्राला सुरुवात होईल, यानिमित्ताने देवी भक्तांसाठी ही समाधानकारक बातमी आहे.
नांदेडच्या पूर्व-ईशान्य दिशेला असलेल्या डोंगर रांगाच्या माथ्यावर रेणूका देवी, अनुसया माता आणि दत्त शिखर हे देशातील सर्व भाविकांचे श्रध्दा स्थान आहे. याचबरोबर या डोंगर रागांच्या पायथ्यातून पैनगंगा नदी आपला अवखळ प्रवाह घेत पुढे विदर्भात जाते. अनेक वर्षापासून या भागात असलेली जैवविविधता, वनसंपदा, वन्यजीव हे पर्यटनाच्या दृष्टीनेही शक्ती स्थळ राहीले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या प्रमूख शक्तीपिठापैकी एक असलेल्या माहूर गडाचा कायापालट केला जाणार आहे. माहूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या मातृतिर्थाजवळील कॉमन फॅसिलिटी सेंटरपासून तीनही गडांना जाण्या-येण्यासाठी रोप वे चे काम आता जलद गतीने पूर्णत्वास येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लवकरच सर्व वयोगटातील भाविकांना त्यांच्या आवडीनुसार भक्तीसोबत पर्यटनाचीही जोड देता येईल, अशी आशा चव्हाण यांनी व्यक्त केली.
विविध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटनाची जोड देवून भक्तांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच, त्या-त्या भागात रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर गडही त्या दृष्टीने विकसित करुन या परिसरातील वनसंपदेच्या, पर्यटनाच्या विकासकामांना प्राधान्य देत एकात्मिक विकास साधण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
माहूर विकासाच्या दृष्टीने आजवर नोंदविल्या गेलेली पर्यटकांची संख्या, वाहनांची वर्दळ, भक्त व पर्यटकांना अत्यावश्यक असलेल्या सेवा सुविधा, पर्यावरणाच्या दृष्टीने लागणाऱ्या वन विभागाच्या मान्यता, येथील भुगर्भ रचनेनुसार कामाच्या गुणवत्तेबाबत आवश्यक असलेली काळजी व तसा आराखडा ही सर्व कामे प्रकल्प कार्यान्वित यंत्रणा म्हणून वॅपकॉस लिमिटेड ही कंपनी करेल. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली ही विकासकामे होतील, अशी माहितीही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिली.
इतर बातम्या-
Chanakya Niti : आयुष्यातील या 4 कारणांमुळे व्यक्तीला व्हावे लागते अपमानित
Garuda Purana : या 6 सवयी आयुष्यात दुःखाचे कारण बनतात, गरुड पुराणात आहे उल्लेख