औरंगाबादः पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा संदेश मोबाइलवर पाठवून एक विवाहित तरुण मागील चार दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. औरंगाबादमधील हर्सूल परिसरात (Aurangabad Harsul) ही घटना घडली असून या तरुणाचा शोध घेण्यासाठी वडिलांनी पोलिसात (Aurangabad police) धाव घेतली आहे . 27 ऑक्टोबर रोजी हा तरुण घरातून निघून गेला असून पोलीस या प्रकरणी तपास करीत आहेत.
हर्सूल पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार या प्रकरणी दाखल झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, दिगंबर नानुराम डुबे (वय 23) असे या तरुणाचे नाव असून तो हर्सूल परिसरातील घृष्णेश्वर कॉलनीतून 27 ऑक्टोबर रोजी गायब झाला आहे. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता दूध आणायला जातो म्हणून तो घराबाहेर पडला होता. यावेळी त्याने त्याचा मोबाइल घरीच ठेवला होता. उशीरापर्यंत दिगंबर घरी परतला नाही म्हणून नानूराम यांनी शेजारी सतीश पंडित यांना हा प्रकार सांगितला. पंडित यांनी त्यानंतर दिगंबरचा मोबाइल तपासल्यानंतर तो घरातून निघून गेल्याचे उघड झाले.
वडिलांच्या विनंतीवरून शेजारी पंडित यांनी दिगंबरचा मोबाइल तपासला. त्यावेळी ‘मी दिगंबर नानूराम डुबे बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. तरी माझी शेवटची इच्छा माझ्या नावावर असलेली संपत्ती माझ्या वडिलांच्या नावावर व्हावी, त्यामध्ये बायकोचा कुठलाही अधिकार नाही’ असा मेसेज दिसून आला. हा मेसेज पाहिल्यानंतर घाबरलेल्या वडिलांनी हर्सूल पोलीस स्टेशन गाठले. तसेच दिगंबर बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान, हर्सूल पोलीस ठाण्यात दिगंबर बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. आज 4 दिवस उलटून गेले तरीही दिगंबरचा पत्ता लागलेला नाही. त्याने घरातून बाहेर पडल्यावर आत्महत्या करतोय, असे सांगितल्यामुळे संपूर्ण कुटुंब धास्तावले आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर शोध घ्यावा, अशी विनंती ते पोलिसांना करत आहेत.
इतर बातम्या