नांदेड: उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एक सारखीच आहे. उद्धवजींचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाही, असं सांगतानाच देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विरोधकांना ठणकावले.
अब्दुल सत्तार आज निवडणूक प्रचारासाठी देगलूर येथे आले होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखी आहे. त्यांचा आदेश आला की शिवसैनिक शांत बसणार नाहीत. देगलूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसैनिक विरोधकांचा मुडदा पाडतील, असं सत्तार म्हणाले.
नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. देगलूर विधानसभेसाठी 30 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे. भाजपनं देगलूर बिलोली जागेसाठी शिवसेनेतील नाराज नेते सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. सुभाष साबणे शिवसेनेत नाराज होते. साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून ते मैदानात उतरले आहेत. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोना संसर्गामुळे निधन झाले होते. त्यांच्या निधानानंतर ही जागा रिक्त होती.
सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.
वंचित बहुजन आघाडीने पत्रक प्रसिद्ध करुन आपला उमेदवार घोषित केला. देगलुर-बिलोली विधानसभा मतदारसंघाच्या 30 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार घोषित करत आहोत. डॉ. उत्तम रामराव इंगोले यांना उमेदवारी देत आहोत, असं वंचित आघाडीने म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील देगलूरसह देशातील 30 विधानसभा आणि तीन लोकसभा पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या 30 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून 2 नोव्हेंबर रोजी या जागांचे निकाल जाहीर होणार आहेत. पश्चिम बंगालमध्ये चार, आसाममध्ये पाच, मेघालय, मध्यप्रदेश आणि हिमाचल प्रदेशात प्रत्येकी तीन जागांवर विधानसभेच्या पोटनिवडणुका होणार आहेत. तर राजस्थान, बिहार आणि कर्नाटकात प्रत्येकी दोन आणि मिझोराम, तेलंगना, नागालँड, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि हरियाणात प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होणार आहे.
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 Super Fast News | 7 October 2021 https://t.co/dggsmwcTwO #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 7, 2021
संबंधित बातम्या:
Deglur Biloli bypoll : देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित
काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनामुळे निधन
(abdul sattar attacks bjp over Deglur Biloli by poll election)