औरंगाबाद: राज्यात तसेच देशभरात प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादमधील सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात (Siddharth Zoo, Aurangabad) सध्या हरिण आणि सांबरांची संख्या जास्त झाली आहे. त्यामुळे राज्यातील इतर प्राणिसंग्रहालयांनी येथील प्राणी घेऊन जाण्याचे आवाहान औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे (Aurangabad Municipal Corporation) करण्यात आले आहे. सिद्धार्थ उद्यानातील वातावरण प्राण्यांसाठी अनुकूल असल्याने येथे दिवसेंदिवस प्राण्यांची संख्या वाढत आहे. वाघांसाठीदेखील (Tigers in Aurangabad) येथील वातावरण अनुकूल असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे येथून आतापर्यंत अनेक वाघ इतर प्राणिसंग्रहालयात नेण्यात आले आहेत.
सिद्धार्थ उद्यानातील पिवळे आणि पांढरे वाघ हा जसा आकर्षणाचा विषय आहे, तसेच येथील हरिण आणि सांबरांचे मनमोहक कळपही प्राणीप्रेमींचे लक्ष वेधून घेत असतात. प्राणि संग्रहालयात मुक्तपणे संचार करणाऱ्या या कळपांना येथील वातावरण पोषक ठरत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात येथील हरिण आणि सांबरांची संख्याही वाढली आहे. येथील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक प्राण्याला जीवापाड जपले आहे. सध्या प्राणिसंग्रहालयात 50 हरिण आहेत तर सांबरांची संख्या 44 वर पोहोचली आहे. मात्र या दोन्हीही प्राण्यांना ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पिंजऱ्यांमध्ये एवढ्या जास्त संख्येने हे प्राणी ठेवणे सध्या अशक्य होत आहे. त्यामुळेच राज्यातील इतर प्राणिसंग्रहालयांना येथील प्राणी घेवून जाण्याचे आवाहन सिद्धार्थ उद्यान व्यवस्थापनाने केले आहे.
एवढ्या मोठ्या संख्येने प्राण्यांचे संगोपन करणे अशक्य असल्याने सिद्धार्थ उद्यानाच्या वतीने महापालिकेने राज्यातील नागपूर, मुंबई, पुणे, बोरिवली येथील प्राणिसंग्रहालयाच्या व्यवस्थापनाशी पत्रव्यवहार केला आहे. येथील हरिण व सांबर घेवून जा, असे आवाहन केले आहे. महापालिका उपायुक्त सौरभ जोशी यांनी ही माहिती दिली. आठ-दहा दिवसांपूर्वी हा पत्रव्यवहार झाला असून अद्याप इतर प्राणिसंग्रहालयांकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान, सिद्धार्थ प्राणी संग्रहालयातील हे अतिरिक्त प्राणी सिंगल आहेत. त्यांना देवाण-घेवाणीतून जोडीदार मिळवून देण्याचा प्राणिसंग्रहालयाचा प्रयत्न आहे, अशी माहितीही सौरभ जोशी यांनी दिली.
औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयाने राज्यात तसेच देशभरातील विविध प्राणिसंग्रहालयांना आतापर्यंत तीसपेक्षा जास्त वाघ दिले आहेत. महाराष्ट्रातील प्राणिसंग्रहालयासह मध्यप्रदेश, पंजाब, छत्तीसगडमध्येही मागणीनुसार वाघ पाठवण्यात आले होते. इतर प्राणिसंग्रहालयात प्राणी पाठवण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची परवानगी आवश्यक असते. या प्रक्रियेनुसारच हा व्यवहार केला जातो.
इतर बातम्या
Aurangabad Alert : नगरमध्ये एकूण 68 गावांत लॉकडाऊन,औरंगाबादेत येणाऱ्या प्रत्येक बसची तपासणी