औरंगाबादः सामाजिक सुरक्षितता, नातेसंबंधातील निकोप देवाण-घेवाण, कौटुंबिक सलोख्यासाठी उभी राहिलेली लग्नसंस्था (Marriage systeme) नेमकी कुठल्या दिशेने झेपावतेय, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. हा प्रश्न विचारला जावा, अशा घटना अनेक घडतात. पण निमित्त ठरलंय औरंगाबादमधील एका घटनेचं. शिक्षण घेतेनाच कुटुंबातील सदस्यांनी नात्यातील एक मुलीचे मुलाशी लग्न ठरवले. नियोजित वधू-वर दोघेही काही दिवस लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले. मग नवरदेवाने अचानक 20 लाख रुपयांचा हुंडा मागितला. पण ती मागणी पूर्ण न झाल्यामुळे त्याने दुसऱ्याच मुलीसोबत लग्न केले. या प्रकरणी फसवणूक झाल्याची तक्रार बेगमपुरा पोलीस ठाण्यात पीडितेने दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद विद्यापीठात एमफिल करणाऱ्या विद्यार्थिनीचे नात्यातील एका मुलासोबत 2016 मध्ये प्राथमिक बोलणीनंतर लग्न जमले. दोघांनीही शिक्षण झाल्यानंतर लग्न करू, असा प्रस्ताव कुटुंबियांसमोर ठेवला. शिक्षण सुरु असताना पीडिता वसतिगृहात राहत होती. तेव्हा मुलगा मुलांच्या वसतिगृहात राहत होता. लग्न ठरल्यामुळे दोघांचे फोनवर बोलणे, भेटणे वाढले. मार्च 2020 मध्ये कोरोना काळात वसतिगृह बंद झाल्यामुळे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले.
दरम्यान काही दिवसांनी मुलाने हुंड्यासाठी मुलीकडे तसेच तिच्या कुटुंबियांकडे हट्ट केला. मात्र हुंडा देण्यास सदर कुटुंबियांनी नकार दिला. पीडिता घरी निघून आली. तेव्हा मुलाने 28 मे 2021 रोजी माजलगाव तालुक्यातील एका मुलीशी लग्न केले. ही माहिती मिळाल्यानंतर पीडितेने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी गुन्हा दाखल करून घेत, अधिक तपासासाठी प्रकरण उपनिरीक्षक राठोड यांच्याकडे सोपवले आहे.
इतर बातम्या-