अहमदनगरः अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर करा, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. स्वाभिमानी मुख्यमंत्री (CM Uddhav Thackeray)असाल जिल्ह्याच्या नामांतराचा निर्णय तत्काळ घ्या आणि आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत, हे सिद्ध करा, असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. अहमदनगर येथे अहिल्याबाई होळकरांचा (Ahilyabai Holkar) जन्म झाला होता. त्यामुळे आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 व्या जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्याला त्यांचं नाव देण्याची मागणी पडळकरांनी केली आहे. यांसदर्भातील एक पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवल्याचंही पडळकरांनी म्हटलं आहे. तसेच चौंडी येथे भक्तांना अहिल्यादेवी होळकरांचं दर्शन घेण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप करत गोपीचंद पडळकरांनी शरद पवार यांचा तीव्र शब्दात निषेध केला.
गोपीचंद पडळकरांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘ शेकडो हिंदुंचा बळी घेणाऱ्या मुंबई ब्लास्टचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या बहिणीसोबत आर्थिक व्यवहार करणारे नवाब मलिक यांचे पालनकर्ते शरद पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीत पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून रोखलं. हिंदू राजमाता जयंती म्हणजे यांना नातवाला लाँच करण्याचा इव्हेंट वाटतो? जेव्हा हिंदु मंदिरं लुटली जात होती, तेव्हा अहिल्यादेवींनी मंदिरांचा जीर्णोद्धार केला. म्हणून तमाम अहिल्यादेवी प्रेमींची भावना आहे की, अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, त्या अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्यानगर करण्यात यावे.’
हिंदू राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या जिल्ह्याचे ‘अहमदनगर’ नाव बदलून ‘अहिल्यादेवी नगर’ करण्यात यावे.नामांतराचा निर्णय तातडीने घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालणारे नसून स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध कराल.जय अहिल्या,जय मल्हार…@CMOMaharashtra pic.twitter.com/51xIYlvp5U
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) June 2, 2022
अहमदनगरच्या नामांतराचा तातडीनं निर्णय घ्यावा, असा इशाराही गोपीचंद पाडळकर यांनी दिला आहे. ते म्हणाले, ‘ हा निर्णय तातडीनं घेऊन आपण काकांच्या रिमोट कंट्रोलवर चालत नाहीत, हे दाखवून द्या. स्वाभिमानी मुख्यमंत्री आहात हे सिद्ध करा आणि होळकरशाहीचा सन्मान कराल, ही अपेक्षा आहे. अन्यथा हा बहुजन समाज जागा झालाय आणि संघटित झालाय, असा इशारा गोपीचंद पडळकरांनी दिलाय.
अहमदनगरच्या नामांतरावरून गोपीचंद पडळकरांनी अशी मागणी केली. मात्र नगर जिल्ह्यातील पुणतांबा इथं सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनातील शेतकऱ्यांनी मात्र पडळकरांच्या या भूमिकेवर नाराजी दर्शवली आहे. कुठेतरी जातीपातीचं भावनेचं राजकारण करण्यापेक्षा आज राज्यातील शेतकरी अडचणींचा सामना करतोय हे प्रश्न दिसत नाहीत का..? असा सवाल उपस्थित केलाय.