छत्रपती संभाजीनगर : खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचं गेल्या तीन दिवसांपासून साखळी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद शहराच्या नामांतराला त्यांचा विरोध आहे. त्यासाठीच त्यांचं आंदोलन सुरु आहे. पण या आंदोलनातील एक विचित्र प्रकार बघायला मिळाल्याने वाद निर्माण झालाय. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनात औरंगजेबाचा फोटो झळकवण्यात आलेला. त्यावरुन वाद निर्माण झालाय. पण जलील यांनी संबंधित प्रकाराचं समर्थन केलेलं नाही. दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेकडून जलील यांच्यावर टीका केली जातेय. या सगळ्या गदारोळादरम्यान जलील यांनी औरंगजेब आमच्यावर का लादता? असा थेट सवालच केलाय.
“आम्हाला औरंगजेबासोबत काही देणं घेणं नाही. त्याचा आणि आमचा काही संबंध नाही. जसं शहराचा नामांतर आमच्यावर लादलं तसा औरंगजेब आमच्यावर का लादता? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी केलाय. औरंगजेबाची कबर जिथे हलवायची तिथं हलवा. आम्हाला विचारताय की सांगताय हे कळायला मार्ग नाही:, असं इम्तियाज जलील म्हणाले.
“जर आमची परवानगी हवी असेल तर त्याचं एक पत्र घेऊन या. बघू आम्ही परवानगी द्यायची की नाही”, असा टोलाही जलील यांनी लगावला. “आमचं उपोषण नाही तर साखळी आंदोलन आहे. त्यामुळे तिथं रोजच जेवण होणार. कदाचित माझं पहिल्या दिवशी मराठी चुकलं असेल आणि म्हणून मी उपोषण म्हणालो असेल”, असा यू टर्न इम्तियाज जलील यांनी यावेळी घेतला.
या शहरात कायदा व्यवस्था बिघडवण्याला आम्ही जबाबदार नाही. आमचा काही संबंध नाही. तुम्ही नामांतर आमच्या शहरावर लादता आणि उलट आम्हाला शहराचं वातावरण बिघडवता असं म्हणता. हे योग्य नसल्याचं जलील म्हणाले. आमचं आंदोलन शांतता प्रिय मार्गाने आहे. ते राहील. सगळ्यांनी शांततेने आंदोलन करावं. कायदा व सुव्यवस्थेची काळजी सगळ्यांनी घ्यावी, असं आवाहन मी यावेळी करतो, असंही जलील म्हणाले. तर जो कोणी शांततेत आंदोलन करेल त्या सगळ्यांना आमचा पाठिंबा असेल, असंही जलील म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका केली आहे. “इम्तियाज जलील ही निजामाची औलाद आहे. असदुद्दीनओवैसी आणि इम्तियाज जलील हे हैदराबादचं पार्सल आहे. म्हणून ते औरंजेबाचा फोटो दाखवतात. पण आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही इम्तियाज जलील जाणीव करून देऊ की तुला आता संभाजीनगर म्हणावं लागेल”, असं शिरसाट म्हणालेत.