औरंगाबाद: नाशिक, पुणे रेल्वेमार्गांसाठी राज्य सरकार 70% निधी देण्यास तयार आहे. असाच भार औरंगाबाद-चाळीसगाव, औरंगाबाद-नगर-पुणे मार्गासाठीही उचलावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Rao Saheb Danve) यांनी बुधवारी केले. रेल्वे अर्थसंकल्प पूर्वतयारीचा भाग म्हणून नांदेड रेल्वे विभागातील मराठवाडा-विदर्भातील खासदारांची बैठक औरंगाबादेत दानवेंच्या अध्यक्षतेखाली झाली. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस खासदार संजय जाधव, खासदार इम्तियाज जलील, खासदार फौजिया खान यांची उपस्थिती होती. आतापर्यंत नांदेडमध्ये रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली खासदारांची बैठक होत होती. बुधवारी जालन्याचे खासदारच रेल्वे राज्यमंत्री असल्याने त्यांच्या अध्यक्षतेत औरंगाबादेत दीड तास बैठक घेण्यात आली.
खासदार जाधव, फौजिया खान आणि इम्तियाज जलील यांनी नांदेड विभाग दक्षिण मध्य रेल्वेऐेवजी मध्य रेल्वेशी जोडला तरच मराठवाड्याचा विकास होईल असे सांगितले. त्यासाठी त्यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या विद्युतीकरणाची आकडेवारी सादर केली. आंध्र, तेलंगणात दोन वर्षांत 4000 किलोमीटर विद्युतीकरण झाले आहे, तर नांदेड विभागाने अकोला – लोहगाव असे केवळ 35 किमीचे काम केले. एवढा अन्याय आमच्यावर होत असेल तर या विभागात राहायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. मराठवाड्याला दानवेंच्या रूपाने पहिला रेल्वेमंत्री मिळाला आहे. त्यांनी नांदेड विभाग मध्य रेल्वेत आणला तर ती खऱ्या अर्थाने गोविंदभाईंना श्रद्धांजली ठरेल. जलील यांनी दिलेल्या माहितीनुसार सिकंदराबाद विभागात 1189, विजयवाडा 925, गुंतकल 1152, गुंटूर 629, हैदराबाद 81 असे विद्युतीकरण झाले आहे. त्यावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदरसिंग यांनी नांदेड विभाग महसुलीदृष्ट्या फायद्यात नसल्याने काम होत नसल्याचे सांगितले. इम्तियाज यांनी आक्षेप घेत मराठवाडा मागास असल्याने प्रत्येक वेळेस नफ्यातोट्याची गणिते पाहिली तर विकास कधीच होणार नाही, असा मुद्दा मांडला.
बैठकीत नांदेड-मनमाड विद्युतीकरण, औरंगाबादेत पिटलाइन, शिवाजीनगरात भुयारी मार्गासह अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. हे मुद्दे रेल्वे बोर्डापुढेही मांडले जातील. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना औरंगाबादेत समृद्धी महामार्गाजवळ रेल्वेमार्ग सुरू करण्याविषयी त्यांच्याशी चर्चा करून पत्रही दिले. या प्रकल्पासाठी राज्य सरकार 50% निधी देणार आहे. पंतप्रधानांनी देशात ७ प्रकल्पांना चालना देण्याचे ठरवले आहे. त्यात हा प्रकल्प असून त्यासाठी सर्वेक्षण होत आहे. मुदखेड ते मनमाड दुहेरीकरण अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करू, असेही दानवे म्हणाले.
खासदार फौजीया खान, अमरावती मुंबई, औरंगाबाद मुंबई (तेजस एक्सप्रेस), शेगाव पंढरपूर, अजनी मुंबई, कोल्हापूर गोवासाठी रेल्वेगाड्या सुरु करण्याची मागणी केली. जनशताब्दी हिंगोलीपर्यंत करावी, नांदेड औरंगाबाद, नांदेड पुणे, नागपूर कोल्हापूर या गाड्या दररोज सोडाव्यात, औरंगाबाद नगर, औरंगाबाद चाळीसगाव, जालना खामगाव या गाड्या सुरु कराव्यात, त्याचप्रमाणे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष रेल्वेगाड्या चालवाव्यात, मराठवाड्याच्या राजधानीचे शहर असल्याने औरंगाबाद रेल्वेस्टेशन हायटेक करावे, त्याचप्रमाणे राज्यात मोजक्या महिला कुली आहेत, त्यांच्या कुटूंबातील सदस्यांना सामावून घेत महिलांची अवजड कामातून सुटका करावी, अशा विविध मागण्या त्यांनी केल्या.
इतर बातम्या-