औरंगाबाद: घाटीत (Aurangabad Ghati Hospital) उभ्या राहिलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या इमारतीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ब्लॉकच्या इमारतीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीसाठीची कॅथलॅब, सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर सज्ज झाले आहेत. घाटीत सुपरस्पेशालिटी (Superspeciality) विभाग सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी कोरोनाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांवर तिथे अद्याप उपचार सुरू झालेले नाहीत. मात्र आता या ठिकाणी हृदयरोग विभाग सुरू होण्याची शक्यता आहे.
हृदय रुग्णांच्या उपचारासाठी 3 डीएम कार्डिओलॉजिस्ट, सर्जन, चतुर्थश्रेणी कर्मचारी उपलब्ध आहेत. मात्र 20 परिचारिकांचा स्टाफ मिळत नाही. या परिचारिका मिळाल्यातर अवघ्या आठ दिवसात घाटीत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टीची उपचार सुविधा सुरु होऊ शकते. प्रभारी अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे यांनी याबाबत सुपरस्पेशालिटी विभाग आणि मेडिसिन विभागाचा आढावा घेतला. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य उपसंचालक यांच्याकडेदेखील नर्सेसची मागणी करण्यात आल्याची माहिती डॉ. रोटे यांनी दिली.
सध्या शहरात हृदय शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयाचेच उंबरठे झिजवावे लागत आहेत. अशा आजारांवरील उपचाराचा खर्चही अनेकांना परवडणारा नसतो. मात्र घाटीत हा विभाग सुरू झाल्यास मराठवाडा, खान्देश व विदर्भातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.
सुपरस्पेशालिटी विभागाचे डॉ. सुधीर चौधरी यांनी सांगितले की ‘आमच्या विभागात सर्व मशिनरी तयार आहेत. नर्स मिळाल्या की लगेच अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी सुरू करण्यात येईल. खासगीत अँजिओग्राफीला 15 ते 25 हजार रुपये खर्च येतो, तर अँजिओप्लास्टीसाठी आणखी खर्च येतो. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांत दररोज सरासरी 50 शस्त्रक्रिया होतात. मात्र घाटीत हे युनिट सुरू झाल्यास रोज जवळपास दहा शस्त्रक्रिया होऊ शकतात.’
घाटी रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी ठप्प आहे. परिणामी घाटीतून खासगी रुग्णालय गाठण्याची वेळ हृदयविकाराच्या रुग्णांवर ओढवत आहे. घाटी रुग्णालयातील सीव्हीटीएस विभागात गेल्या काही वर्षांत उपचाराने शेकडो हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनाद मिळाले. येथील कॅथलॅब मार्च 2019 मध्ये नादुरूस्त झाले. कॅथलॅबचा वापर 10 वर्षांवर झाल्याने ती दुरूस्त होणे अशक्य असल्याचे सांगण्यात आले. घाटी सुपर स्पेशॅलिटी ब्लॉकमध्ये आता कॅथलॅब प्राप्त झाली आहे. परंतु नर्सिंग स्टाफच्या प्रतीक्षेमुळे अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी सुरु करण्यास अडचणी येत आहेत.
इतर बातम्या-
औरंगाबाद शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू, महापालिका हॉकर्स झोन पॉलिसी राबवणार