पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार? राज्यसभेवर घेण्याची मागणी; कुणी धरला आग्रह?

| Updated on: Jun 18, 2024 | 11:12 AM

लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यांचा हा पराभव सहन न झाल्याने त्यांच्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केली आहे. पंकजा मुंडे या पराभूत झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची मागणी जोर धरू लागली आहे.

पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन होणार? राज्यसभेवर घेण्याची मागणी; कुणी धरला आग्रह?
Pankaja Munde
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित होऊ लागला आहे. आमदार सुरेश धस यांनी पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घेतलं जावं आणि हा निर्णय तातडीने घ्यावा, असा आग्रहच सुरेश धस यांनी धरला आहे. त्यामुळे भाजप पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळेच पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

आमदार सुरेश धस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मागणी केली आहे. पंकजाताई यांचं राजकीय पुनर्वसन केलं पाहिजे. त्यांना राज्यसभेवर सदस्य म्हणून घेवून त्यांचं पुनर्वसन करावे. त्याचा पक्षाने तातडीने विचार केला पाहिजे. सध्या बीड जिल्ह्यात अस्वस्थता आहे. पक्षाने तातडीने निर्णय घेतला पाहिजे. अशी पक्षाकडे विनंती आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

कांदा, सोयाबीनला भाव हवा

नियोजन समितीच्या बैठकीला सुरेश धस उपस्थित होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली. या बैठकीला नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनावणेही उपस्थित होते. निवडणुका झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती. पंकजाताई काल भावनिक झाल्या होत्या. आत्महत्येच्या ज्या घटना घडतात ते विदारक आहे. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असं आवाहन सुरेश धस यांनी केलं. उद्या कॅबिनेटची बैठक आहे. कांदा, सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. कांद्याला अनुदान मिळाले पाहिजे. भावांतर योजना सुरू केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले.

वेगळा निर्णय घेतील असं वाटत नाही

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांना वेगळा निर्णय घेण्याची गळ घातली आहे. त्यावरही धस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. छगन भुजबळ मोठे नेते आहेत. समता परिषद त्यांचीच संघटना आहे. भुजबळ कोणताही निर्णय घेतील असे वाटत नाही. ते आमचे मित्रपक्ष असलेल्या अजितदादा पवार यांच्याच गटात राहतील असे मला वाटते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राज्यसभेच्या तीन जागा रिक्त

भाजपच्या राज्यात राज्यसभेच्या तीन जागा रिक्त झाल्या आहेत. पीयूष गोयल, नारायण राणे आणि उदयनराजे भोसले हे राज्यसभेवरील तिन्ही सदस्य लोकसभेत गेल्याने या तिन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर भाजप कुणाला पाठवणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. महाराष्ट्रातील नेत्यांची या जागांवर वर्णी लागणार की इतर राज्यातील नेत्यांना राज्यसभेवर पाठवलं जाईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.