राज्यात सत्ता कशी मिळवायची? अर्जुन खोतकरांनी सांगितलं सोप्पं गणित; आघाडी फॉर्म्युला स्वीकारणार?

| Updated on: Nov 05, 2021 | 4:37 PM

राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत. मात्र, त्या आधीच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्तेचा फॉर्म्युला सांगितला आहे. (arjun khotkar suggest assembly election seat sharing formula to maha vikas aghadi)

राज्यात सत्ता कशी मिळवायची? अर्जुन खोतकरांनी सांगितलं सोप्पं गणित; आघाडी फॉर्म्युला स्वीकारणार?
arjun khotkar
Follow us on

जालना: राज्यातील विधानसभा निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत. मात्र, त्या आधीच शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी सत्तेचा फॉर्म्युला सांगितला आहे. आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी प्रत्येकी 50-50 जागा जिंकून आणायच्या. मग सत्ता आपलीच आहे. भाजपला कधीच एवढ्या जागा जिंकता येणार नाही, असं गणितच अर्जुन खोतकर यांनी मांडलं आहे. त्यामुळे आघाडी खोतकरांचा हा फॉर्म्युला स्वीकारणार का? असा सवाल केला जात आहे.

दिवाळी निमित्त आयोजित स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात अर्जुन खोतकर बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकार चालवण्यात खंबीर आहेत. मी तुम्हाला विधानसभेचं एक सोपं गणित सांगतो. शिवसेनेने 50 जागा निवडून आणायच्या. राष्ट्रवादी आणि काँग्रेसनेही प्रत्येकी 50 जागा निवडून आणायच्या. म्हणजे दीडशे जागा होतील. काय भेटणार यांना? 50-50 जागा तर आपल्या कधीही निवडून येतात. भाजपवाले पावणे दोनशे जागा निवडून आणू शकतात का? आता तर पिसळून जात आहेत. ज्या होत्या त्याही जागा चालल्या आहेत. हे गणित लक्षात घ्या. तिन्ही पक्षांनी 50-50 जागा आणल्या तर आम्ही पुन्हा येऊ म्हणणाऱ्यांनो सत्ता विसरून जा, तुमचा कधीच नंबर लागू शकणार नाही, असं खोतकर म्हणाले.

आमचा एकच नवाब मलिक भारी पडला

यावेळी त्यांनी विरोधकांवरही जोरदार हल्ला चढवला. सरकारला काही काम करूच द्यायचं नाही हे त्यांनी ठरवून टाकलं आहे. त्यामुळे रोजच कोण ना कोण येऊन बोलत असतात. तोतरे, धातरे फातरे सर्वच येऊन बोलत असतात. पण आमचा एकच नवाब मलिक भारी पडला. नवाब मलिक यांचं एक तोंड उघडलं अन् सर्वच जण बिळात जाऊन बसले. नवाब मलिकांनी सर्वांची नवाबी खलास करून टाकली, असा टोलाही त्यांनी लगावला.

जालन्यात साखर कारखाना

जालन्यात गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेला साखर कारखाना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. आज सकाळीच माझ्या भावाशी माझं बोलणं झालं. त्याने साखर कारखाना सुरू करण्यास होकार दर्शविला. त्यामुळे मी तुमच्यासमोर ही घोषणा करत आहे. सरकार आपलं आहे. मंत्रीही आपलेच आहेत. त्यामुळे ते आपल्याला साखर कारखाना सुरू करण्यास मदत करतील, असं त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

किरण गोसावीच्या कोठडीत 8 नोव्हेंबरपर्यंत वाढ, कोर्टाचा दिलासा नाहीच

उद्या भाऊबीज, पंकजाताईंकडून शुभेच्छा आल्या का? धनंजय मुंडे म्हणतात, अजूनतरी नाही पण …

शेतकऱ्यांनी साधले पाडव्याचे मुहूर्त, लातूरच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्रमी आवक अन् दरही…

(arjun khotkar suggest assembly election seat sharing formula to maha vikas aghadi)