मुंबईः आर्यन खानवर (Aryan khan) 2 ऑक्टोबर रोजी क्रूझ ड्रग्स प्रकरणी एनसीबीने कारवाई केली. या प्रकरणी आर्यन खान निर्दोष आहे, हे सिद्ध करण्यासाठी शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि के पी गोसावी तसेच सुनील पाटील यांनीच प्लॅन आखल्याचा आरोप सॅम डिसूजा याने केला आहे. ‘सुनील पाटील आणि के पी गोसावी यांनीच मला चुकीच्या पद्धतीने अडकवलं आहे’, असा आरोप सॅम डिसुझा याने केला. एनसीबीकडून समन्स पाठवल्यानंतर सॅम डिसूजा आज चौकशीसाठी हजर झाला होता. मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी आणि आर्यन खानला या केसमधून वाचवण्यासाठी शाहरूख खानच्या मॅनेजरकडून 25 कोटी रुपयांची डील झाल्याच्या प्रकरणात आज सॅम डिसूजाची चौकशी झाली. एनसीबीच्या टीमने सॅमचा जबाब नोंदवला.
एनसीबीचत्या चौकशीनंतर, tv9 च्या प्रतिनिधींशी बोलताना सॅम डिसूजा म्हणाला, ‘आर्यन खानला वाचवण्यासाठी डीलचा सगळा प्लॅन सुनील पाटील आणि किरण गोसावीने मिळून केला होता. मी या डीलमध्ये सहभागी नव्हतो. डील फिक्स झाल्यानंतर किरण गोसावीचे बॉडीगार्ड प्रभाकर साईलने शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीकडून 50 लाख रुपये टोकन मनीच्या रुपात घेतले. अशी एखादी डील होत आहे, याची मला माहितीसुद्धा नव्हती. हे सगळ्या घडल्यानंतर मला माहिती मिळाली. मी डीलमध्ये सहभागी असतो, तर माझ्या खात्यात काहीतरी पैसे आले असते ना?’
सॅम डिसूजाने चौकशीत सांगितले की, ”किरण गोसावीला मी यापूर्वी ओळखत नव्हतो. सुनील पाटीलकडून मला गोसावीचा नंबर मिळाला तेव्हा मी गोसावीचा नंबर एनसीबीला पाठवला. ” म्हणजेच सॅम डिसूझानेच एनसीबीच्या अधिकाऱ्यांना किरण गोसावीची ओळख करून दिली, तसेच दुसरीकडे शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानीचीही ओळख करून दिली , अशी कबूली सॅम डिसूजाने यावेळी दिली. मात्र अशा प्रकारची डील होत असल्याची आपल्याला कल्पना नव्हती, या मुद्द्यावर सॅम डिसूजा ठाम राहिला.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनाही मी आतापर्यंत एकदाच भेटलो आहे, अशी माहिती सॅम डिसूजाने दिली. तसेच व्ही.व्ही. सिंग यांच्याशी माझं जे बोलणं झालं होतं, ते विड बेकरी संदर्भातल्या एका केससाठी मला समन्स होता, त्यावरून बोलणं झालं होतं, असं स्पष्टीकरण सॅम डिसूजाने दिलं आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी, मनिष भानुशाली आणि सॅम डिसुजा हेच मास्टरमाइंड असल्याचा दावा सुनिल पाटील यांनी यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत केला होता. तर सुनील पाटील हेच आरोपी असून त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचं खळबळजनक वक्तव्य मोहित कंबोज यांनी केलं होतं.
सुनील पाटील हे धुळ्याचे रहिवासी असून ते माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमधून 2009 ते 2014 मध्ये बबनराव पाचपुते जेव्हा आमदार होऊन कॅबिनेट मंत्री झाले त्यावेळी सुनील पाटील हे त्यांच्या बंगल्यावर नेहमी दिसायचे, असं म्हटलं जातं. सुनीव पाटील यांचे सोशल मीडियावरही काही फोटो आहेत, त्यात ते भाजपचे गुजरातचे मंत्री किरीट सिंह राणा यांच्यासोबत तर दुसऱ्या एका फोटोत मनीष भानुशालीसोबत दिसतात.
इतर बातम्या-