औरंगाबादः नागपूर-मुंबई या बहुचर्चित समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) औरंगाबाद जवळील माळीवाडा (Aurangabad Maliwada) शेजारी असलेल्या जांभळा गावातील टोल प्लाझाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या टोल प्लाझाचे डिझाइनच एवढे आकर्षक आहे की, येणाऱ्या-जाणाऱ्यांचे तो लक्ष वेधून घेत आहे. या वास्तुकडे पाहिलं की, जणू काही सुंदर पंख पसरलेला पक्षीच आहे, असा भास होतो. हा टोलनाका एकूण 10 लेनचा असेल.
नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गावर जवळपास प्रत्येक 30 किमी अंतरावर इंटरचेंज आहे. प्रत्येक इंटरचेंजच्या ठिकाणी टोल प्लाझा उभारण्यात येत आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर कुठेही टोल नाका नसेल, मात्र समृद्धी महामार्गावर प्रवेश करतानाच हे टोलप्लाझा उभारण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्गासारखे ठराविक अंतरावर गेल्यावर येथे टोल भरण्याची गरज नाही.
समृद्धी महामार्गावर प्रवेश करतानाच टोल भरावा लागेल. त्यानंतर रस्त्यात कुठेही टोलनाके नाहीत. समजा औरंगाबादहून तुम्हाला नाशिकला जायचे असेल तर औरंगाबादच्या टोलवरच नाशिकपर्यंतचा टोल भरावा लागेल. नाशिकला गेल्यानंतर समृद्धी महामार्ग सोडताना तेथील इंटरचेंजला औरंगाबादमध्ये भरलेल्या टोलची तपासणी होईल. पण एखाद्या वाहनधारकाने औरंगाबादहून समृद्धीवर जाताना शिर्डीला जायचे, असे सांगून शिर्डीपर्यंतचा टोल भरला आणि प्रत्यक्षात तो शिर्डीऐवजी पुढे नाशिकपर्यंत गेला तर नाशिकच्या इंटरचेंजवर त्या वाहनधारकाला दंड भरावा लागेल.
देशीतल इतर राष्ट्रीय महामार्गांची प्रणाली पाहता, तेथे फास्टॅग सक्तीचे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहनांना थांबण्याची आवश्यकता भासत नाही. मात्र, समृद्धी महामार्गावर फास्टॅगची व्यवस्था नसेल. कारण या मार्गावर बसचे तिकीट काढल्यासारखा पुढील प्रवासाचा टोल भरावा लागणार आहे.
इतर बातम्या-