औरंगाबादः कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील बृहत लघु मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याजवळ पंधरा वासरे मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ माजली आहे. ही सगळीच वासरे पांढरा रंग असलेल्या राजस्थानी प्रजातीच्या गाईची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही वासरे नेमकी कशामुळे मृत्यू पावली, याचे अधिकृत कारण समजलेले नाही. पोलीस या प्रकरणी शोध घेत आहेत. मात्र प्राथमिक अंदाजानुसार, कत्तल करण्यासाठी गायींना घेऊन जाणाऱ्या वाहनात या वासराचा गुदमरून मृत्यू झाल्यानंतर ती या ठिकाणी टाकून दिली असावी, असा संशय पोलिसांनी (Aurangabad police) व्यक्त केला आहे.
याविषयी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, देवगाव रंगारी येथील काही शेतकरी नेहमीप्रमामे सोमवारी सकाळी बृहत लघु मध्यम प्रकल्पाजवळ गेले होते. या प्रकल्पाच्या सांडव्याच्या पात्रातून दुर्गंधी येत होती. यामुळे त्यांनी परिसरात पाहणी केली असता त्यांना पांढरा रंग असलेल्या राजस्थानी गायींची पंधरा वासरे मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती शेतकऱ्यांकडून मिळाल्यानंतर शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य गोकुळ गोरे, बीट जमादार अप्पासाहेब काळे, जावेद शेख, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद ठोंबरे, आसिफ पठाण, अनिल गोरे, चंद्रभान गोरे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मात्र ही वासरे नेमकी कशामुळे मृत्यू पावली आहेत, याचे कारण कळेनासे झाले.
प्राथमिक अंदाजानुसार, रविवारी रात्री कुणीतरी कत्तल करण्यासाठी गायींची वाहतूक करणाऱ्या वाहनात नेत असताना या वासरांचा मृत्यू झाला असावा. या वाहनात गुदमरून मृत्यू झाल्यानंतर त्यांना या परिसरात टाकून देण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्या-