औरंगाबादः कंपनीत काम करणाऱ्या एक इंजिनिअर (Engineer) तरूणीने साडे 14 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचं उघडकीस आलं आहे. डिसेंबर 2021 मध्ये ही मुलगी कंपनी सोडून गेली. काही काळानंतर तीने वापरलेल्या कंप्युटरची तपासणी केली असता त्यातून तब्बल साडे 14 कोटी रुपयांचा डेटा हॅक झाल्याचं उघडकीस आलं. ही घटना कळताच कंपनीतील अधिकाऱ्यांचे धाबेच दणाणले. आपल्याच कंपनीतील माजी कर्मचारी असा धोका देऊ शकते, हे पाहून अनेकांना धक्का बसला. औरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीतील (waluj MIDC) एंड्युरन्स टेक्नोलॉजी या कंपनीत ही घटना घडली. या प्रकरणी कंपनीने सायबर पोलीस (Cyber police) ठाण्यात आरोपी तरुणीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर तरुणीने नेमक्या कोणत्या डिव्हाइसच्या आधारे ही चोरी केली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवानी कुरूप (26, शकुंतला अपार्टमेंट, समर्थनगर) असं आरोपीचं नाव असून मागील वर्षी ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 या कालावधीत ती वाळूज MIDC तील एंड्युरन्स कंपनीत कामाला होती. आरोपीने स्वतःच्या फायद्यासाठी आणि कंपनीचे नुकसान व्हावे या उद्देशाने कंपनीच्या मालकीचा गोपनीय डेटा इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करून चोरल्याचे उघडकीस आले आहे. हा डेटा चोरून नेण्यासाठी तिने कोणते डिव्हाइस वापरले, याविषयीचा तपास पोलीस करत आहेत. तसेच ही तरुणी सध्या कोणत्या कंपनीत काम करतेय, कुठे राहतेय, याचाही तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, ही मुलगी निघून गेल्यानंतर कंपनीने तिने वापरलेल्या संगणकाची तपासणी केली असता तिने कंपनीची गोपनीय माहिती चोरल्याचे निदर्शनास आले. हा डेटा तब्बल 14 कोटी 47 लाखांचा होता, असा दावा एंड्यूरन्स कंपनीने केला आहे. याप्रकरणी कंपनीच्या वतीने रोहित साळवी यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशी करून 19 मे रोजी शिवानी विरोधात फसवणूक, विश्वासघात करणे, कंपनीचे नुकसान करणे, सायबर कायद्याच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदवला आहे. पोलीस निरीक्षक गौतम पातारे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.