औरंगाबादः मैत्रिणीने (Friend) बोलणे बंद केले म्हणून तिच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट सुरु केले. त्यावर तिची छायाचित्रही पोस्ट करायला सुरुवात केली. एवढेच नाही तर मैत्रीण आणि मित्रांना संदेश पाठवणेही सुरु केले. त्यानंतर या तरुणीला मध्यरात्री घराबाहेर भेटायला ये, नाही तर आणखी त्रास देईन, अशा प्रकारच्या धमक्याही दिल्या. या सगळ्या प्रकारांनंतर 17 वर्षीय तरुणीने औरंगाबाद ग्रामीण सायबर (Cyber) पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी (Aurangabad police) तत्काळ तपास सुरु करताच तरुणीचा मित्रच हा सगळा प्रकार करत होता, हे उघड झाले. पोलिसांनी या मित्राला ताब्यात घेतले. पण एवढा भयंकर प्रकार मित्रच करत होता, हे कळ्याल्यानंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबाला चांगलाच धक्का बसला.
या विषयी ग्रामीम सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक सुभाष दराडे रा. जिंतूर (परभणी) असे आरोपीचे नाव आहे. बारालीच्या वर्गात शिकत असताना त्याची एका अल्पवयीन युवतीशी ओळख झाली होती. दीपक बीए द्वितीय वर्षात शिकतो. त्याचे वडील चालक आहेत. अल्पवयीन मुलीसोबत ओळखीचे रुपांतर प्रेमात व्हावे, अशी दीपकची इच्छा होती. मात्र युवतीने यासाठी पूर्ण नकार दिला. तिने त्याच्याशी बोलणेही बंद केले. सगळे संपर्क तोडून टाकले. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या दीपकने ती भेचायला आली पाहिजे, यासाठी तिच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट तयार केले. त्या अकाउंटच्या फ्रेंड रिक्वेस्ट तिच्या मैत्रिणींना पाठवल्या.
या बनावट अकाउंटवरून इतर मैत्रिणींनाही मेसेज पाठवले गेले. त्यामुळे तिला या प्रकाराची माहिती झाली. पण हे अकाउंट नेमके कुणी तयार केले, याचा खुलासा होत नव्हता. दीपकने नंतर युवतीलाही मेसेज केले. तिने एकदा दीपकला याविषयी विचारलेदेखील. पण त्याने आपल्यालाही असे मेसेज येत असल्याची थाप मारली. त्यानंतर युवतीने आई-वडिलांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर ग्रामीण सायबर पोलीस ठाण्यात 12 एप्रिल रोजी तक्रार दाखल करण्यात आली.
दरम्यान, पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषण करीत बनावट खात्याचा शोध घेतला. तेव्हा दीपकनेच स्वतःच्या मोबाइलवरून हे खाते तयार केल्याचे उघड झाले. त्याला न्यायालयाने सुरुवातीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
इतर बातम्या-