औरंगाबादः भुसावळहून औरंगाबादला निघालेल्या एका कारला गुरुवारी सकाळी जामनेर टाकळीदरम्यान भीषण अपघात झाला. धाकट्या भावाच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या या कारमध्ये नवरदेवाचा मोठा भाऊ, चुलत बहीण आणि ब्युटीशियन अशा तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर कारमधील अन्य दोन महिला गंभीर जखमी आहेत. सुदैवाने या अपघातात 10 महिन्याचे बाळ बचावले.
भुसावळमधील गोविंदा सैंदाणे यांचा मोठा मुलगा पंकज हा जयपूर येथे राहतो तर लहान मुलगा पुण्यात अभियंता आहे. शुक्रवारी औरंगाबादेतील मथुरा लॉन्समध्ये राजनचा विवाह ठरला होता. गुरुवारी सायंकाळी हळद समारंभ असल्याने सकाळीच भुसावळहून वऱ्हाडी चार वाहनांतून रवाना झाले. मोठा भाऊ पंकज सैंदाणे इंडिगो कारने निघाला. मात्र लग्नासाठीचे कपडे घरीत राहिल्याने तो माघारी फिरला होता. कपडे सोबत घेतल्यानंतर पुन्हा औरंगाबादकडे येताना जामनेरजवळ अज्ञात ट्रकने त्याच्या कारला धडक दिली. या अपघातात पंकज, चुलत बहीण पर्तिभा आणि ब्युटिशियन सुजाता हिवरे हे तिघे ठार झाले. त्यामुळे लग्नघरात शोकाकूल वातावरण झाले. तसेच नवरदेवाची वहिनी हर्षदा सैंदाणे, नेहा अग्रवाल हे जखमी झाले.
लग्नासाठी भुसावळहून कार घेऊन निघालेल्या पंकज सैंदाणे याच्या कारचा वेग ताशी 110 किमी एवढा होता. अपघात स्थळाला भेट दिल्यानंतर पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी कारचा वेग नियंत्रणात असता तर हा अपघात टळला असता, असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
इतर बातम्या-