औरंगाबादः राज्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं सरकार नुकतंच सक्रिय झालं आहे. त्यामुळे मागील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात नियोजन विभागाने औरंगाबादसाठी (Aurangabad) मंजूर केलेल्या अनुदानावरच टाच आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने 04 जुलै रोजी संध्याकाळी एक परिपत्रक काढले. त्यात प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांना स्थगिती देऊन फेरआढावा घेण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादचा 500 कोटींचा निधीही या आदेशामुळे थांबला आहे. यात औरंगाबाद शहराचा नियमित 325 कोटींचा तसेच सुधारीत 175 कोटी असा सर्व 500 कोटी रुपयांचा निधी मिळणार होता. त्यामुळे आराखड्यातील प्रशासकीय मान्यता दिलेली आणि निधीसाठी शिफारस केलेली सर्व कामे आता खोळंबली आहेत. शिंदे सरकारचे खातेवाटप झाल्यावर औरंगाबादला कोणता पालकमंत्री होणार यावर सदर निधी कितपत मंजूर होईल, याचा निर्णय घेतला जाईल.
नव्या एकनाथ शिंदे सरकारमध्ये पालकमंत्र्यांची तसेच नियोजन समितीतील नियुक्ती लवकरच होणार आहे. नियोजन समितीवर नवीन सदस्य आमि विशेष निमंत्रिकांची नेमणूक होणार असल्याने 1 एप्रिलपासून आजवर दिलेल्या विविध योजनेअंतर्गत काांना दिलेल्या प्रशासकीय मान्यतांना स्थगिती देण्यात आली आहे. पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर त्यांच्यासमोर सर्व कामांची यादी सादर करून ती कामं सुरु ठेवायची की थांबवायची याचा निर्णय होईल, असे नियोजन विभागाने पत्रात म्हटले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास 3 कोटी 19 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यात नावीन्यपूर्ण योजनेसाठी 9 लाख 76 हजार, वैजापूर तालुक्यात कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी 2 कोटी 84 लाख, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी 10 लाख, 24 लाख 27 हजार रुपयांचा निधी कन्नड, पैठण, औरंगाबादमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी मंजूर करण्यात आला होता. आता नवे पालकमंत्री नियुक्त होईपर्यंत ही कामे खोळंबणार आहेत.
एकनाथ शिंदे सरकारमधील नवीन निर्णयानुसार, औरंगाबादचं पालकमंत्री पद कुणाकडे येणार, याच्या चर्चा सध्या रंगू लागल्यात. बंडखोर शिंदेसेनेसाठी औरंगाबादमधील आमदारांचं मन वळण्यासाठी मोठी भूमिका घेतलेले औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना पालकमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपदेखील शिवसेनेचा हा गडही काबीज करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे औरंगाबादला भाजपचा पालकमंत्री मिळेल का शिंदेसेनेचा, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.