औरंगाबादः महाराष्ट्रात सत्तांतराचं महानाट्य सुरु असतानाच ठाकरे सरकारने (Uddhav Thackeray Government) अखेरच्या कॅबिनेट बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले. औरंगाबादचं नाव संभाजीनगर (Sambhaji Nagar) करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली, तसाच औरंगाबादच्या दृष्टीने आणखी एक निर्णय घेतला गेला. राज्यातील सामान्य प्रशासन विभागाने काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश बुधवारी रात्री काढले. यात मनपाचे आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय (Astik kumar Pandey) यांची बदली करण्यात आली. त्यांच्याऐवजी डॉ. अभिजित चौधरी हे नवे आयुक्त असतील. तसेच महापालिकेचे प्रशासकदेखील असतील. आस्तिक कुमार पांडेय यांची औरंगाबादेतच सिडकोच्या मुख्य प्रशासकपदी नेमणूक करण्यात आली आहे. तर अभिजित चौधरी हे सांगलीचे जिल्हाधिकारी होते, ते आता मनपाच्या आयुक्तपदाचा कारभार स्वीकारतील.
महापालिका आय़ुक्त म्हणून आस्तिक कुमार पांडेय यांनी 9 डिसेंबर 2019 मध्ये पदभार स्वीकारला होता. सामान्यांमध्ये पांडेजी.. या नावाने त्यांची ख्याती होती. मागील दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने पांडेंनी प्रशासक म्हणून एकहाती कारभार पाहिला. शहराच्या विकासासाठी केलेल्या कामाबद्दल मी समाधानी आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी काल व्यक्त केली. स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणूनही त्यांनी काम पाहिले. स्मार्ट सिटी बस, गुंठेवारी योजना, क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा, मनपाच्या शाळेत सीबीएसई पॅटर्न आदी महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. कोरोना काळातही विविध आरोग्य योजनांवर त्यांनी युद्धपातळीवर काम केले.
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी हे औरंगाबाद महापालिकेचे नवे आयुक्त असतील. अभिजित चौधरी हे मूळ भुसावळचे असून डॉ. व्ही.जी. चौधरी आणि डॉ. छाया चौधरी यांचे ते पुत्र आहेत. अभिजित चौधरींचं शालेय शिक्षण भुसावळलाच झालं असून मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण झालं. एमबीबीएस केल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी केली. 2003 पासून ते भारतीय प्रशासकीय सेवेत आहेत.
महापालिका आय़ुक्त तथा प्रशासक म्हणून आस्तिक कुमार पांडेय यांनी अनेक आघाड्यांवर खिंड लढवली. सध्या पुढील काही महिन्यात महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. याची तयारी मनपा प्रशासकांसमोरील आव्हान आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीचं काम सुरु आहे. विशेष म्हणजे शहरातील बहुचर्चित पाणी योजनेच्या कामावर आणि तिच्या गतीवर विरोधकांचं आणि सामान्य नागरिकांचं बारीक लक्ष आहे. पाणी प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका प्रशासन काय काय उपाययोजना राबवत आहे, याकडेही जनता डोळे लावून बसली आहे. भाजपनेही हा प्रश्न लावून धरला आहे. त्यातच आता औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर केल्यानं शहरात सुरक्षेचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. नवे महापौर निवडून येईपर्यंत मनपा प्रशासक म्हणून अभिजित चौधरी यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत.