औरंगाबादः शहरातील सिडको परिसरातील मनपाच्या प्रियदर्शिनी उद्यानात सापडलेली ब्रिटिशकालीन नाणी (British Coins) मुंबईला नेण्यात येणार आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचे (Balasaheb Thackeray) काम येथील उद्यानात सुरु आहे. स्मारकाच्या संरक्षक भिंतीसाठी खोदकाम सुरु असताना येथे काही ब्रिटिशकालीन नाणी आढळून आली. तेव्हापासून राज्यभरात या नाण्यांची चर्चा आहे. तसेच त्या नाण्यांवर पुरातत्त्व विद्वानांचा अभ्यासही सुरु आहे. दरम्यान, आपल्याला ही नाणी पाहयची आहेत, अशी इच्छा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. त्यामुळे औरंगाबादहून अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईला रवाना होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्रियदर्शनी उद्यानात ठाकरे स्मारकाच्या सुरक्षा भिंतीच्या कामासाठी खोदकामावेळी एका पिशवीत अतिदुर्मिळ अशी ब्रिटिशकालीन 1690 नाणी सापडली होती. या नाण्यांवर सोन्याचा दाट मुलामा चढवण्यात आलेला आहे. आता ही नाणी मुंबईला नेण्यासाठी जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्यासह अप्पर तहसीलदार, राज्य पुरातत्व विभागाचे अधिकारी मुंबईला रवाना होणार आहेत. त्यानंतर ही नाणी राज्य पुरातत्त्व विभागाच्या संचालकांकडे सुपूर्द केली जाणार आहेत, असी माहिती अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिली.
पुरातत्त्व विभागाचे अभिरक्षक अमृत पाटील हे गुरुवारी अप्पर तहसील कार्यालयात आले. त्यांनी पाहणी केल्यानंतर सापडलेली ही नाणी नसून ब्रिटिशकालीन टोकन असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानंतरही या नाण्यांवर अधिक सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
इतर बातम्या-