औरंगाबादः औरंबादच्या पाणी पुरवठा योजनेची गती वाढवण्याच्या सूचना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिल्या आहेत. ठाकरे यांनी आज औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर महत्त्वाची बैठक घेतली. शहरात सुरु असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या (water supply scheme) कामाचा सविस्तर आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. तसेच इथून शहरातील पाणीपुरवठा योजनेवर थेट मुंबईतून वॉच असेल. दर 15 दिवसांनी मुख्यमंत्र्यांकडून या योजनेचा आढावा घेतला जाईल. एकूणच, आगामी महापालिका निवडणुकांच्या (Municipal corporation) पार्श्वभूमीवर शहरातील भाजप, मनसे आणि इतर विरोधकांनी उचलून धरलेल्या पाणी प्रश्नावर शिवसेनेनं अधिक गांभीर्यानं पावलं उचलायला सुरुवात केलेली दिसतेय. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली येथे मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. मनसेनंही पाणी संघर्ष यात्रा आयोजित केली होती. शहरातील पाणी प्रश्नावर मोठं राजकीय नाट्य रंगलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा विषय अधिक सविस्तरपणे हाताळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण तसेच पालकमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. यावेळी महापालिका प्रशासकांनी शहरातील नव्या पाणीपुरवठा योजनेचं काम कुठवर आलंय, याचा अहवाल सादर केला. मुख्यमंत्र्यांनीही अत्यंत बारकाईने याचा अभ्यास केला. तसेच यापुढे पाणीपुरवठा योजनेची गती वाढवण्याचेही आदेश दिले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने शहरातील पाणी प्रश्न चांगलाच उचलून धरला आहे. शहरात सर्वाधिक पाणी पट्टी वसूल केली जात असूनही नागरिकांना अनेक आठ ते दहा दिवसाच्या अंतराने पाणी येतं. अनेकदा पाणी येण्याचा दिवस असताना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना पाणी भरता येत नाही. वेळापत्रक कोलमडतं. शहरातील जुनी पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्यामुळे अनेकदा त्यात बिघाड होतो. पाईपलाइन फुटते. तिची डागडुजी करेपर्यंत पाण्यात व्यत्यय येतो. या सर्व समस्यांना नागरिक कंटाळले. त्यामुळे भाजपने हाच मुद्दा उचलून धरत शहरात मोठा जलाक्रोश मोर्चा काढला. मात्र त्यानंतर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं पाणी प्रश्वावर उपाययोजना सुरु केल्या. शहरातील पाणी उपसा वाढवून जास्तीत जास्त पाणीपुरवठा कसा केला जाईल, यासंबंधी उपाययोजना राबवल्या जात आहेत. पालकमंत्र्यांनी आदेश काढत, नवी पाणीपुरवठा योजना होईपर्यंत पाणीपट्टी निम्मीच भरावी, अशा सूचना केल्या. तसेच अत्यंत संथ गतीने सुरु असलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेचा आढावा खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेवर आरोप करण्यासाठी भाजपच्या हातून एक मुद्दा निसटणार की काय, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.