औरंगाबादः मंगळवारी औरंगाबाद जिल्ह्यातील (Aurangabad corona) रुग्णांची संख्या अचानकच वाढल्याचे दिसून आले. मागील आठवड्यापासून रुग्णसंख्येत हळू हळू वाढ होताना दिसून येत होती. मात्र मंगळवारी अचानक रुग्णसंख्येने शंभरी पार केली. शहरात 87 तर ग्रामीण भागात 16 रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दररोज दोन ते तीन हजार नागरिकांच्या कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.
दरम्यान, शहरातील 2 ओमिक्रॉनच्या रुग्णांची प्रकृती बरी असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. हे दोन्ही रुग्ण शहरातच आढळून आले होते. त्यांना महापालिकेच्या मेल्ट्रॉन आणि मेडिकव्हर या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारण झाल्यामुळे घरी पाठवण्यात आले, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
जिल्ह्यातील वाढलेली कोरोना रुग्णांची संख्या ही तिसऱ्या लाटेची चाहूल असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले. यामुळे जिल्ह्यात दररोज 2400 ते 2500 कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, गर्दीत जाणे टाळणे, सतत हात धुणे या नियमांचे पालन केले पाहिजे. तसेच पात्र असूनही लसीकरणाकडे दुर्लक्ष केलेल्यांनी वेळीच लस घ्यावी, असे आवाहनही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केले जात आहे.
– मंगळवारी जिल्ह्यात 103 कोरोना रुग्ण आढळले.
– मंगळवारी 24 जण कोरोनामुक्त झाले. त्यातील 20 महापालिका हद्दीतील तर चौघे ग्रामीणमधील होते.
– आतापर्यंत एक लाख 46 हजार 209 जण बरे होऊन परतले.
– जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाख 50 हजार 39 झाली आहे.
– आजपर्यंत एकूण तीन हजार 656 जणांचा मृत्यू झाला असू 174 जणांवर उपचार सुरु आहेत.
इतर माहिती-