मुंबईः राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या औरंगाबाद येथील सभेवर पोलिसांनी (Aurangabad police) 16 अटी टाकल्या होत्या, तेव्हाच आम्हाला कळलं होतं. पोलीस या प्रकरणी कारवाई करणार याची आम्हाला कल्पना होती. सरकारला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर (Maharashtra Navnirman Sena) दबाव निर्माण करायचा आहे, हेच यातून स्पष्ट होतंय, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या 16 पैकी 12 अटींचं उल्लंघन केल्याचं पोलिसांच्या अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कलम 116, 117, 153 अंतर्गत राज ठाकरेंविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याविरोधात राज्यभरातील मनसे नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही याविषयी टीव्ही9 कडे प्रतिक्रिया दिली.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घातलेल्या अटींवरच आक्षेप घेतला. ते म्हणाले, पोलिसांनी अटी टाकल्या होत्या तेव्हाच आम्हाला कळलं होतं. राज ठाकरे यांच्या सभेला फक्त 15 हजार लोक आले पाहिजेत, ही अट कशी असू शकते? आम्ही 15 हजारच लोक बोलावले होते. पण प्रत्यक्षात लाखभर लोक गोळा झाले, त्याला आम्ही काहीही करू शकत नाहीत. अशा प्रकारे कारवाई करून महाविकास आघाडी सरकारला मनसेवर दबाव निर्माण करायचा आहे. पण आम्ही घाबरत नाहीत. मनसे संघर्ष करत राहणार. आम्ही कायदेशीर आणि रस्त्यावरचीही लढाई लढली आहे. आता भोंग्यांविरोधात राज ठाकरे जो पुढचा आदेश देतील त्याचं पालन आम्ही करणार, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 116, 117 आणि 153 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.