औरंगाबादः देवगिरी महानंद या ब्रँडने मराठवाड्याच्या बाजारपेठेत दबदबा निर्माण केलेल्या औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. संघाच्या संचालकांच्या 14 जागांसाठी काल 14 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकारले जात आहेत. यंदाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी आशा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली गेली होती. मात्र सध्या तरी ती शक्यता मावळलेली दिसत आहे. संघाचे विद्यमान अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे आणि त्यांचे कट्टर विरोधक माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक ठरणाल आहे.
– औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या 14 जागांसाठी 24 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.
– 27 डिसेंबर रोजी अर्जांची छाननी केली जाईल.
– 11 जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत आहे.
– 12 जानेवारी रोजी चिन्हांचे वाटप केले जाणार
– 22 जानेवारी रोजी मतदान होईल
– 23 जानेवारी रोजी मतमोजणी होईल.
– औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या या निवडणुकीत 9 तालुक्यांतून 9 प्रतिनिधी निवडले जातील. महिलांसाठी 2, अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय व विमुक्त, भटक्या जातींसाठी प्रत्येकी 1 अशा 14 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीत सुमारे 350 सभासद मतदानाचा हक्क बजावतील.
सध्या दूध उत्पादक संघावर सर्वपक्षीय संचालक मंडळ कार्यरत आहे. भाजपचे आमदार हरिभाऊ बागडे हे संघाचे अध्यक्ष आहेत तर शिवसेनेचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचे समर्थक नंदलाल काळे हे उपाध्यक्ष आहेत. गेल्या पाच वर्षात आमदार हरिभाऊ बागडे यांनी नियमितपणे शएतकऱ्यांना बोनसचा लाभ मिळवून दिला, ही त्यांची सध्याची जमेची बाजू आहे.
दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत फुलंब्री आणि औरंगाबाद या दोन तालुक्यांतील मतदान निर्णायक ठरणार आहे. कारण एकूण 350 मतदारांपैकी फुलंब्रीत 81 तर औरंगाबाद तालुक्यात 61 मतदार आहेत. या दोन्ही तालुक्यांत आमदार हरिभाऊ बागडे आणि माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यात राजकीय वर्चस्व टिकवण्यासाठी धडपड दिसून येईल. त्यातही रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची भूमिका महत्त्वाची ठरेल. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आपल्या समर्थकांची वर्णी लावण्यात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यशस्वी झाले होते. आता दूध संघाच्या निवडणुकीतही तोच पॅटर्न दिसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या-