औरंगाबादः शहरातील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरच्या (DMIC) बिडकीन फेजमध्ये फूडपार्क (Food Park) उभारण्यात येईल, अशी घोषणा दोन वर्षांपूर्वीच झाली होती. पण हे काम औरंगाबाद इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेडने अद्याप सुरुच केले नाही. कारण कंपनीला हे काम करण्यासाठी कंत्राटदारच मिळालेला नाही. निविदा प्रक्रिया दोन वेळा राबवण्यात आली. मात्र दोन्ही वेळेस चढ्या भावाने निविदा दाखल झाल्याने उद्योग विभागाने तूर्तास या कामाला ब्रेक दिला आहे.
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरमध्ये 500 एकर जागेत फूड पार्क उभारण्यात येईल, अशी घोषणा दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर उद्योग विभागाने या फूडपार्कसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी एआयटीएलच्या वतीने निविदा काढण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत एकही निविदा दाखल न झाल्याने या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर दोन एजन्सींनी निविदा दाखल केल्या होत्या. प्रशासनाने रीतसर प्रक्रिया करुन निविदांची तपासणी केली. त्यात दोन्ही निविदा चढ्या दराच्या आल्या होत्या.
दरम्यान, शेंद्रा आणि बिडकीन डीएमआयसीच्या दोन्ही फेजमध्ये अद्याप एकाही मोठ्या कंपनीचा उद्योग आलेला नाही. शेतकऱ्यांसाठी फूडपार्क होणे आवश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या कामासाठी कंत्राटदारच मिळत नसल्याने हे काम सुरु होण्याआधीच बंद पडले आहे. उद्योग विभागानाही या कामाऐवजी शेंद्रा आणि बिडकीनमधील उपलब्ध प्लॉट वितरणावर लक्ष केंद्रीत केले आहे.
दरम्यान, 25 जानेवारी रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने आभासी पद्धतीने शहरातील संत एकनाथ रंगमंदिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचीही उपस्थिती होती. या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मी बरेच दिवस झाले, संभाजीनगरात आलो नाही. येथील नागरिकांची थेट भेट घेतलेली नाही. त्यामुळे येत्या काळात लवकरच शहराला भेट अवश्य देईन,’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे मुख्यमंत्री शहरात येतील, त्या दौऱ्यात तरी विलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी नागरिकांना आशा आहे.
इतर बातम्या-