औरंगाबादः औरंगाबादसह (Aurangabad) राज्यभरात वृक्ष अच्छादन वाढवण्याचे काम करणाऱ्या मराठवाडा इको बटालियनला पाच वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण 20 टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या (Eco Batalian) सहकार्यातून वृक्षलागवड केली जाते. हे काम करणाऱ्या औरंगाबाद येथील पहिल्या इको बटालियन कंपनीस आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी तसेच अतिरक्त दोन इको बटालियन कंपनीसाठी केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावाचा तातडीने पाठपुरावा करावा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिले. इको बटालियनच्या माध्यमातून राज्यातील निवृत्त माजी सैनिकांना रोजगार प्राप्त होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, नवी दिल्लीचे प्रादेशिक सेना महासंचालक लेफ्टनंट जनरल पी.एम.सिंग, औरंगाबादच्या इको बटालियनचे कमांडिंग ऑफीसर प्रादेशिक सेनेचे (इकॉलॉजी) कर्नल मन्सुर अली खान, यांच्यासह वन विभागाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हवाई बीज पेरणी- वृक्षांची हवाई बीज पेरणी करतांना जिथे लोकांचे येणे जाणे कमी आहे, नैसर्गिकरित्या त्या बीजाला आणि रोपांना पाणी मिळू शकेल, पुरेशी माती उपलब्ध असेल अशी स्थळे निवडण्यात यावीत. ज्या डोंगरावर वरच्या बाजूला सपाट जागा उपलब्ध आहे तिथे छोटे तळे घेऊन पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवता येईल का याचा वन विभागाने विचार करावा जेणेकरून डोंगरावर लावलेल्या रोपांना सोलर पंपाच्या सहाय्याने, सुक्ष्म सिंचन पद्धतीने पावसाळ्यानंतरही पाणी देता येऊ शकेल. वन विभागाने यावर्षी त्यादृष्टीने असा पथदर्शी कार्यक्रम तयार करून अंमलात आणावा.
औरंगाबाद इको बटालियन ने मागील पाच वर्षात 662 हेक्टरक्षेत्रावर जवळपास 8 लाख 71 हजार 477 झाडं लावली असून ही रोपे जगण्याचे प्रमाण सरासरी 89.54 टक्के इतके असल्याची माहिती कर्नल मन्सुर अली खान यांनी यावेळी दिली. आजघडीला इको बटालियनने स्वत: तयार केलेल्या रोपवनामध्ये 2.50 लाख रोपे तयार असल्याचेही ते म्हणाले. इको बटालियन मधील सैनिक रोप लागवडीपासून त्यांच्या संरक्षणापर्यंतची काळजी घेत असल्याने वृक्ष जगण्याचे प्रमाण अधिक आहे. हे काम करत असतांना त्यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या वन्यजीव संरक्षणाचेही काम होत असल्याचे ते म्हणाले.
ठाणे, नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद वनवृत्तामध्ये, राजगड, रायगड, शिवनेरी किल्ल्याच्या सभोवताली गेल्या पावसाळ्यात हवाई बीज पेरणी अंतर्गत राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती बैठकीत देण्यात आली.