औरंगाबाद : कळसापासून पायापर्यंत अत्यंत सुबक असे कोरीव काम केलेल्या वेरूळ (Ellora Caves) येथील जगप्रसिद्ध लेण्या हा औरंगाबाद नगरीचा मोठा ऐतिहासिक ठेवा आहे. याच ऐतिहासिक लेण्यांचं (Historical caves) सौंदर्य पर्यटकांना अधिक चांगल्या पद्धतीने दाखवण्यासाठी आता डोंगरावर एक रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाकडून (ASI) तयार कऱण्यात आला आहे. कैलास लेणी वरील बाजूने पाहिल्यावर पर्यटकांना ती अद्वितीय व भव्य असल्याची अनुभूती येईल. येत्या वर्षभरात हा रस्ता तयार होईल, असे एएसआय अर्थात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक डॉ. मिलन कुमार चावले यांनी सांगितले. त्यामुळे आगामी वर्षात कैलास लेणींचं सौंदर्य न्याहाळण्यासाठी आलेल्या पर्यटकांसाठी आणखी एक नवी पर्वणी मिळणार आहे.
कळसापासून पायापर्यंत कोरीव काम करून तयार करण्यात आलेली अशी लेणी जगात फक्त तीनच ठिकाणी आहेत. आफ्रिका, तमिळनाडू आणि वेरूळ अशा तीनच ठीकाण एका दगडातील शिल्पाचे कोरीव काम झाले आहे. त्यापैकी कैलास हे सर्वात मोठे आहे. कळसापासून पायापर्यंत कोरीव शिल्प आहे. डोंगरातून पाहिल्यावर हे स्थळ खरोखरच जागतिक वारसा स्थळ का आहे, ते लक्षात येते. हेच विहंगम दृश्य पर्यटकांना पाहता यावे, यासाठी वरील बाजूने रस्ता तयार करण्याची पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाची योजना आहे. पर्यटकांच्या दृष्टीने हा रस्ता सुरक्षित असेल. सध्या या ठिकाणी एक पाऊलवाट आहे. मात्र ती फारशी सुरक्षित नाही. तिथे रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या महाव्यवस्थापकांनी नुकतीच वेरुळ लेणीची पाहणी केली. हा त्यांचा धावता दौरा होता. यावेळी येथील प्रस्तावित कामांवर चर्चा करण्यात आली. ही कामे पुढील वर्षभरात मार्गी लागतील, असे सांगण्यात आले. त्यात डोंगरावरील रस्त्याचाही प्रस्ताव असल्याची माहिती देण्यात आली आहे.
वेरूळ लेणीतील बॅटरीवर चालणाऱ्या बसेस 14 मार्चपासून सुरु होणार होत्या. मात्र, अजूनही या बसच्या तपासणीचे काम सुरु आहे. 01 मेपासून या बस सुरु होण्याची शक्यता आहे. हे सर्व व्हेंडरवर अवलंबून असून लेणी परिसरात चढ-उतार अधिक असल्याने बसची क्षमता तसेच बॅटरीच्या चाचण्या विभागामार्फत केल्या जात आहेत, असे एएसआयचे अधीक्षक डॉ. चावले यांनी सांगितले.
इतर बातम्या