औरंगाबादः जालना रोडवरील कॅफेत आणि निराला बाजारमधील एका पार्टीत धिंगाणा घालणाऱ्या एका तोतया डीवायएसपीची (Fake DYSP) औरंगाबादेत सध्या चर्चा रंगलीय.. लष्करी जवानासारखी हेअरकट, अंगात जिन्स आणि पांढरा शर्ट, पायात चपला आणि हातात पोलिसांची (Police) फायबर काठी असलेला हा तरुण आकाशवाणी चौक ते निराला बाजार या परिसरात फिरत होता. ठिकठिकाणचे कॅफे बंद करण्यासाठी शिवीगाळ करत, धमकावत होता. जालना रोडवरील (Jalna Road) एका रेस्टॉरंटमध्ये तो शिरला. रात्री पावणे अकराची वेळ होती. त्याच्या सोबत आणखी दोघे जण होते. मी नवीन डीवायएसपी आहे. हॉटेल कुणाचे आहे, असे धमकावत होता. टेबलवर बसलेल्या तरुणींना एवढा वेळ बाहेर काय करताय? असा प्रश्न विचारला. त्यांना ओळखपत्रही मागवले. त्यानंतर मात्र एका तरुणीने भावाला फोन करून सर्व प्रकार सांगितला. मंगळवारी रात्री हा प्रकार घडला.
सदर तरुणीचा भाऊ मित्रांसह रेस्टॉरंटमध्ये दाखल झाला. त्यावेळी तोतया डीवाय एसपीचा धिंगाणा सुरुच होता. हॉटेलमध्ये तरुणीचा भाऊ येताच त्याने प्रश्न विचारायला सुरुवात केली. आपले बिंग फुटणार अशी कल्पना आल्यानंतर त्याने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या महिला आणि पुरुषांनाही तो शिवीगाळ करत सुटला होता. दरम्यान हॉटेल मालकांनी या प्रकाराची माहित जिन्सी पोलिसांना दिली.
जालना रोडवरून निघाल्यावर हा तोतया पोलीस निराला बाजारमध्येही गेला होता. तेथे युवा सेना पदाधिकारी ऋषीकेश जैस्वाल यांच्या वाढदिवसासाठी काही कार्यकर्ते रात्री बारा वाजता त्यांच्या घराजवळ जमले होते. त्यांना पाहून संकेत कारमधून उतरला. त्यांनाही शिवीगाळ सुरु केली. तोपर्यंत हा तोतया असल्याची खबर पोहोचली होती. संकेतने धिंगाणा सुरु करताच तरुणांनी त्याला चांगलाच चोप दिला. त्यानंतर तो तेथूनही निसटला.
दरम्यान, या प्रकाराची पोलिसात तक्रार दाखल झाली होती. जिन्सी पोलिसांनी बुधवारी या तोतया पोलिसाला पकडून ठाण्यात नेले. तेथे त्यांची कसून चौकशी केली तेव्हा त्यांची खरी नावे समोर आली. त्यापैकी स्वतःला डीवाय एसपी म्हणवणारा संकेत हा पुण्यातील एका कंपनीत काम करत असून सध्या मिटमिटा भागात राहतो. पोलिसांनी संकेत जाधव, दिनेश गर्दी, ऋषीकेश गव्हाणे या तिघांना ताब्यात घेतले आहे.
इतर बातम्या-