औरंगाबादः शहरातील घाटी रुग्णालयात वॉर्ड बॉयची नोकरी लावून देण्याच्या आमिषाने अडीच लाख रुपयांची मागणी करत एका तरुणाला 80 हजार रुपयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. सदर व्यक्तीने तरुणाला बनावट नियुक्तीपत्र दिल्याचे उघड झाल्यावर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला गजाआड केले आहे. मात्र घाटीत नोकरी लावून देणारे रॅकेट सक्रिय आहे की काय, असा संशय व्यक्त केला जात आहे.
बेगमपुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्दुल नवीन अब्दुल रशीद शेख असे आरोपीचे नाव आहे. पठाण साबीर खान नासेर खान याने दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहित असून रंगाची कामं करतो. त्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. त्याचा मित्रही शेख चाँद शेख मुराद रंगकाम करत होता. काही दिवसांपूर्वी तो घाटीत नोकरीला लागला. त्याच्या मध्यस्थीनेच साबीरची अब्दुल नवीद या आरोपीसोबत ओळख झाली. आरोपीने त्याला फिल्ड ऑफिसर असल्याची बतावणी केली. तसेच 45 हजार रुपये पगार असल्याचीही थाप मारली. त्यानंतर अब्दुल नावीद याने पठाण साबीरला वॉर्ड बॉयची नोकरी देण्याचे अमिष दाखवले. त्यासाठी अडीच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. परंतु आर्थिक परिस्थिती नसल्याने एकदम एवढे पैसे देता येणार नाहीत म्हटले. मात्र तोपर्यंत टप्प्या-टप्प्याने 80 हजार रुपये दिले. नोकरी लागल्यावर महिन्याला 5 हजार रुपये असे पैसे चुकवतो असेही म्हटले.
25 मे रोजी आरोपी नवीदने पठाण साबीरला नियुक्तीपत्र दिले. ते इंग्रजीत होते. मात्र आताच रुजू होऊ नको, असे सांगितले. 13 ऑक्टोबर रोजी साबीरने नोकरीसाठी तगादा लावला. त्यावर त्याने पुन्हा एक नियुक्तीपत्र दिले. ते घेऊन साबीर 21 ऑक्टोबरला घाटीत रुजू होण्यासाठी गेला. तेथे त्याला ते बनावट असल्याचे कळले. त्यानंतर नवीदला फोन लावला असता, त्याचे दोन्ही फोन बंद असल्याचे आढळून आले. पठाण साबीर खान यांनी बेगमपुरा पोलीस स्टेशनमध्ये दाव घेतली. याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आळा. गुरुवारी रात्रीच पोलिसांनी आरोपी अब्दुल नवीद अब्दुल रशीद शेख याला बेड्या ठोकल्या.
पोलीस तपासात आरोपी अब्दुल नवीद याने अशा प्रकारे नोकरी लावण्याचे आमिष दाखवत अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. या सर्वांनाच पैसे घेऊन बनावट नियुक्तीपत्र दिल्याचेही तपासात समोर येत आहे. तसेच रुग्णालय परिसरात नोकरी लावून देणारे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
इतर बातम्या-