औरंगाबाद: शहर आणि जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरीही आता डेंग्यू, चिकनगुनिया (Dengue, Chikungunia) आणि मलेरिया या आजारांनी नागरिक त्रस्त आहेत. तसेच तापेच्या रुग्णांची (Patient) संख्याही वाढत आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाचा प्रचंड लहरीपणा शहराला अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे हवामानातही कमालीची स्थित्यंतरं पहायला मिळत आहेत. त्यातच महानगरपालिकेकडून नागरी वस्त्यांमधील साचलेले पाणी, रस्त्यांवर साचलेले पाणी यांचा बंदोबस्त न झाल्यामुळे शहरात रोगराईचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे. शहरात प्रत्येक घरात सांधेदुखी, अंगदुखी आणि तापेचे रुग्ण आढळून येत आहेत.
औरंगाबाद शहरात सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे 48 रुग्ण आढळून आले. तर डेंग्यूच्या संशयित रुग्णांची संख्या 97 एवढी नोंदवली गेली. विविध रुग्णालयांमध्ये डेंग्यूसदृश्य आजाराच्या रुग्णांवर उपचार सुरु आहेत. व्हायरल इन्फेक्शनमुळे तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांची संख्या कमालीची वाढली आहे. शहरात सुमारे 550 दवाखान्यांची पालिकेकडे नोंद आहे. यापैकी बहुतांश दवाखान्यात तापाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यातच डेंग्यूच्या रुग्णांनीही चिंतेत भर टाकली आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे 48 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच 97 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरु असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
शहरातील रुग्णांमध्ये बहुतांश जणांना ताप आणि सांधेदुखीचा त्रास होत आहे. मात्र यासाठी डेंग्यू किंवा चिकनगुनियाची तपासणी केली असता, या चाचण्या निगेटिव्ह येत आहेत. कोरोना, मलेरिया, टायफाइडच्या चाचण्या निगेटिव्ह येत आहेत. त्यामुळे हे नेमके कोणते व्हायरल इन्फेक्शन आहे, हे सांगणे डॉक्टरांनाही कठीण जात आहे. एकदा ताप आला की तो तीन-चार दिवस उतरत नसल्यामुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात शुक्रवारी 19 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. तर 14 जणांना उपचार पूर्ण झाल्यावर घरी पाठवण्यात आले. सध्या शहरातील 145 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. औरंगाबादच्या महानगरपालिका हद्दीतील सूतगिरणी चौकात एक, सातारा परिसरात एक, शिवाजी नगरात एक, विष्णू नगरमध्ये एक तर इतर भागात पाच रुग्णांची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागात 10 रुग्णांची नव्याने भर पडली.
इतर बातम्या-
Aurangabad Gold: सोन्यानं झटकली मरगळ, दरात काहीशी वाढ, वाचा औरंगाबादचे दर काय?