औरंगाबादः कर्ज घेण्यासाठी रुपी लोन अॅप इन्स्टॉल (App Install) करणे एका विवाहितेला चांगलंच महागात पडलं. या अॅपद्वारे कर्ज (Instant Loan) घ्यायचं म्हणून महिलेनं सर्व कागदपत्र अपलोड केली. या प्रक्रियेनंतर कर्ज तर मिळालच नाही, पण एक लाख रुपये कर्ज घेतल्याचा मेसेज आला. त्यानंतर विवाहितेचे छायाचित्र एडिट करून अश्लील मजकूर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. सायबर गुन्हेगारांनी (Cyber criminals) तब्बल 16 फोननंबरवरून विवाहितेसह त्याच्या कुटुंबातील सदस्यांना अश्लील फोटो पाठवून 18 हजार रुपये उकळले. औरंगाबादेत माहेर आलेल्या विवाहितेने तक्रार दाखल केल्यानंतर सदर प्रकार उघडकीस आला.
याविषयी अधिक माहिती अशी की, पुण्यात पतीसह राहणारी 39 वर्षीय महिला सध्या औरंगाबादेत वास्तव्यास आहे. त्यांनी पुण्यात मोबाइलवरून लोन घेण्यासाठी रुपी लोन अॅप इन्स्टॉल केले. कर्जासाठी त्यावर आधार कार्ड, पॅनकार्ड व छायाचित्र अपलोड केले. त्यानंतर तुमचा सिबिल स्कोअर खराब असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे कर्ज घेता येणार नाही, असेही सांगण्यात आले. मात्र सहाच दिवसात पुन्हा अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. तुम्ही कर्ज घेतले असून काही रक्कम तुम्हाला भरावी लागणार असल्याचे कॉल सुरु झाले. कॉलवरून उद्धट बोलणे, मेसेजेसची मालिका सुरु झाली. अश्लील मेसेजची धमकीही देण्यात आली. त्यामुळे विवाहितेने घाबरून 18 हजार 124 रुपये युपीआय आयडीवर पाठवले. त्यामुळे सायबर गुन्हेदारांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यानंतर वारंवार कॉल करून पैशांची मागणी सुरु केली होती.
पुण्यात राहताना सुरु झालेल्या या सर्व प्रकाराने तणावाखाली आलेली महिला औरंगाबादेस माहेरी आली. मात्र गुन्हेगारांनी त्यांची आई, भाऊ, बहिणीच्या पतीचे मोबाइल क्रमांक काढून त्यांनाही अश्लील मजकूर पाठवणे सुरु केले. विवाहितेचा फोटो, त्याखाली फ्रॉड व अत्यंत अश्लील मजकूर लिहून छायाचित्र एडिट करून पाठवणे सुरु केले. हा त्रास वाढल्याने दोन दिवसांपूर्वी विवाहितेने उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये याविषयी तक्रार केली.
उस्मानपुरा पोलीसांनी सदर प्रकरणाचा तपास केल्यानंतर कॉल, व्हॉट्सअॅप मेसेज करणाऱ्या 16 मोबाइल धारकांवर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक बागवडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
झटपट कर्ज देणारे अनेक अॅप सध्या बाजारात उपलब्ध आहेत. केवळ काही कागदपत्र घेऊन तत्काळ कर्ज देतात, मात्र त्यानंतर अॅपचालकांचे खरे रुप समोर येते. ब्लॅकमेलिंगच्या रॅकेटद्वारे मोबाइल क्रमांक आणि कागदपत्रांचा गैरवापरही होतो. त्यामुळे अशा झटपट कर्जाच्या अमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.