औरंगाबादः मागील आठवड्यापासून राज्यभरात विशेषतः नाशिक परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने औरंगाबादच्या (Aurangabad) जायकवाडी (Jayakwadi) धरणाचा साठा 75 टक्क्यांपुढे झाला आहे. काल रात्रीपासूनही धरणात पाण्याची आवक सुरुच आहे. कोणत्याही क्षणी धरणातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग होऊ शकते, असे जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी सांगितले. तसेच गोदावरी नदीकाठच्या (Godawari river) गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मागील आठवड्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जायकवाडी धरण परिक्षेत्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी 2 वाजेपर्यंत जायकवाडी धरणाचा जलसाठा 74 टक्के झाला होता. त्यानंतरही पाण्याची आवक सुरुच होती. आज किंवा उद्या धरणातून विसर्ग सुरु होईल. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या 1522 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मराठवाड्यातील प्रमुख जिल्ह्यांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात मागील आठ दिवसांपासून आवक सुरु आहे. वरचे सर्व प्रकल्प 80 टक्के भरले आहेत. जायकवाडी धरणात मागील आठवड्यात 40 टक्के पाण्याची आवक झाली. जायकवाडीत सोमवारी संध्याकाळी पाणीसाठा 75 टक्क्यांवर पोहोचला. हा साठा 90 टक्क्यांवर पोहोचला की पाण्याचा विसर्ग सुरु केला जाणार आहे. सध्या दारणा, कडवा, वालदेवी, गंगापूर, आळंदी, नांदूर मध्यमेश्वर, नागमठाण या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची हजेरी सुरुच आहे. त्यामुळे पाण्याची आवकही सुरुच आहे. म्हणून प्रशासनाने विसर्गाची तयारी सुरु केली आहे.
जायकवाडी धरणातून विसर्ग केल्यानंतर पैठण तालुक्यातील गोदाकाठच्या 14 गावांना फटका बसतो. प्रशासनाने सतर्कतेचा इसारा दिल्यानंतर या गावांत मोठी धावपळ सुरु झाली आहे. गोदावरी पात्रात सोडलेल्या मोटारी शेतकी काढून घेत होते. पात्रालगत असलेले बिऱ्हाड हलवण्याची घाई शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे.
मराठवाड्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या काठावरील गावांची जिल्हानिहाय संख्या पुढीलप्रमाणे
शनिवार आणि रविवारच्या विश्रांतीनंतर औरंगाबाद शहर आणि परिसरात सोमवारी पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला. शहरात सोमवारी जवळपास 9.2 मिमी पावसाची नोंद झाली. तर जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत 48.10 टक्के पाऊस झाला. चिकलठाणा वेधशाळेत 9.2 मिमीपर्यंत पावसाची नोंद झाली.